२५ शिक्षक अद्याप रुजू नाही
By Admin | Updated: July 19, 2016 00:31 IST2016-07-19T00:31:18+5:302016-07-19T00:31:18+5:30
जिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

२५ शिक्षक अद्याप रुजू नाही
बदली प्रक्रियेचा घोळ अद्याप कायम
मोहन भोयर तुमसर
जिल्हा परिषद शाळेतील ३७८ शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी २५ शिक्षक रुजू झाले नाही तर ३५ शिक्षक रुजू होऊन दिर्घ रजेवर गेले. अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या सुमारे ११९ इतकी आहे. ८ जुन २०१६ ला ग्रामविकास मंत्रालयाने सात जिल्ह्यातील बदल्यांना स्थगिती दिली. या जिल्ह्यात मात्र घोळ अद्याप कायम आहे. मागील २१ दिवसांपासुन जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरु आहे.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मे महिन्यात जिल्हास्तरीय जि.प. शिक्षकांच्या ३७६ बदल्या करण्यात आल्या. दरम्यान जिल्ह्यातील २५ शिक्षक रुजू झाले नाही. तर ३५ शिक्षक रुजू झाले नंतर ते दिर्घ रजेवर गेले. दरम्यान ८ जून २०१६ ला प्राथमिक शिक्षक प्रवर्गाच्या बदल्यांना सरसकट स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाने दिली. ७ जिल्ह्यातील बदल्या स्थगित करण्याचे आदेश शासनाने काढले.
सव्वा महिना लोटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने आजपर्यंत स्थगिती आदेशावर कारवाई केली नाही. येथे जिल्हा परिषद प्रशासनाने स्थगितीबाबत वेगवेगळे अर्थ काढले. ११ जून ला शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी १३ जून ला निर्णय देण्याचे लेखी आश्वासन दिले, पंरतु त्या दिवशी ते स्वत: उपस्थित नव्हते. १४ जूनला स्थायी समितीमध्ये ८ जून २०१६ च्या शासनाच्या स्थगितीबाबत निर्णय घेऊन ठराव घेण्यात आला. तरीही कारवाई झाली नाही. बदल्या संदर्भात शासनाने विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. मागील आठवड्यात पुन्हा चार शिक्षकांना सोयीच्या शाळेत बदलीचे आदेश देण्यात आले. अंशत: बदल असा नविन शब्द येथे वापरण्यात आला.
नक्षलग्रस्त तालुक्यातून नक्षलग्रस्त तालुक्यात बदली, प्रशासकीय बदलीस पात्र शिक्षकांना विनंती बदलीचा लाभ, अर्ज व प्रपत्र न देता, पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत ३० किमीच्या अंतराला लक्षात न घेता. १०० ते १३० किमीवर बदली, अपंगाना बदलीतून न वगळणे, रिक्त जागा नसतांनी पदस्थापना देणे, नंतर अतिरिक्त ठरविणे, तालुका बदलून सोयीच्या स्थळी देणे इत्यादी प्रकार येथे झाला असा शिक्षकांचा आरोप आहे. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १३ जून रोजी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पृष्ठांगण करुन उचित कारवाईकरिता आदेश निर्गमित केले.
हेच स्थगितीचे आदेश असून सर्व शिक्षकांनी मूळ आस्थापनेत जायला पाहिजे होते असे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना भेटी दरम्यान सांगितले. या सर्व प्रकरणावरुन अद्याप येथे घोळ असून संभ्रमावस्था आजही कायम आहे.
नक्षलग्रस्त ते नक्षलग्रस्त स्थळी सुमारे ७० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. येथे अन्यायग्रस्त शिक्षकांची संख्या ११९ इतकी आहे. शाळा सुरु होऊन २१ दिवस झाले. कुठे एक शिक्षक दोन ते चार वर्गांना तर कुठे दोन शिक्षक चार वर्गांना अध्यापनाचे कार्य करीत आहेत. जिल्हा परिषद शाळेत सध्या गोंधळाची स्थिती आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अ.वा. बुध्दे, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, श्रावण लांजेवार, राधेश्याम आमकर, गुलाब आव्हाड, सी. पी. मोरे, देवदास भुते, शकून चौधरी, भारती डेकाटे, रेखा वैद्य, गुलाब बामलोटे, व्ही. मुकर्णे, एम. जिभकाटे, डी.पी. भिवगडे, डी. के. चकोले इत्यादी शिक्षकांनी केली आहे.