ग्रामज्योती योजनेचा २५ कोटींचा आराखडा मंजूर
By Admin | Updated: February 21, 2016 00:24 IST2016-02-21T00:24:48+5:302016-02-21T00:24:48+5:30
केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे.

ग्रामज्योती योजनेचा २५ कोटींचा आराखडा मंजूर
जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत निर्णय : दीनदयाल उपाध्याय योजनेतून ग्रामीण विद्युतीकरणावर भर
भंडारा : केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे. या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांना नियमित वीज पुरवठा, अकृषक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वितरण बळकटीकरण व वृद्धीकरण, तांत्रिक व व्यावसायिक वीज हानी कमी करणे, या बाबींसाठी २५.५ कोटी रूपयांच्या पायाभूत विकास आराखड्यास जिल्हा विद्युत समितीने मंजुरी दिली आहे.
खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ.अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत गावठाण फीडर विलगीकरणासाठी चार वाहिन्या प्रास्तावित असून त्यासाठी ५.२६ कोटी रूपये, वितरण व्यवस्थेसाठी २४९ किलोमीटरच्या उच्चदाब वाहिन्या, ६१.४८ किलोमीटरच्या लघुदाब वाहिन्या, आणि १०० के.व्ही.ए.चे ६५ नवीन रोहित्रांसाठी १७.४८ कोटी रूपयांची तरतूद, दारिद्रय रेषेखालील ३,७६५ कुटुंबाना वीज जोडणीसाठी २.४ कोटी रूपये, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी २७ लाख रूपयांची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी, सर्वांना वीज, आणि अखंड व योग्य दाबाने वीज पुरवठा अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवित आहे. त्यामुळे या आराखड्यातील कामे तात्काळ सुरू करावे, असे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.
ज्या गावांमधून किंवा शेतामधून उच्च दाब वीज वाहिन्या गेल्या असतील त्या बदलण्यासाठी प्रस्ताव तयार करा, अशी सुचना खासदार नाना पटोले यांनी यावेळी केली. डिसेंबर २०१५ पर्यंतचे कृषी पंपासाठी पेंडिंग प्रकरणे जून २०१६ पर्यंत पूर्ण होतील. तसेच सोलर पंपासाठी १९५ लक्षांक असून १६ अर्ज आतापर्यंत समितीने मंजूर केले आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी बैठकीत दिली.
ग्राहकांच्या तक्रारीसाठी तीन महिन्यातून एकदा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी, अशी सूचना आमदार अवसरे यांनी केली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीला प्राधान्य द्यावे आणि गोसेखुर्द प्रकल्पातील पुर्नवसित गावांमध्ये वीज जोडणीसाठी शिबिर घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. (नगर प्रतिनिधी)