लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात असून त्यात जिल्हा परिषदेच्या ३९ गटात २३५ तर पंचायत समितीच्या ७९ गणात ४०७ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराला प्रारंभ झाला असला तरी बुधवारी ओबीसी आरक्षणावरुन न्यायालयात काय निर्णय लागताे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात तालुक्यातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील ३९, माेहाडी २३, साकाेली २६, लाखनी १०, भंडारा ७४, पवनी २३ आणि लाखांदूर तालुक्यातील ४० उमेदवारांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या निवडणूकीत तुमसर तालुक्यात ६९, माेहाडी ५०, साकाेली ४२, लाखनी ४४, भंडारा १०३, पवनी ५५ आणि लाखांदूर तालुक्यातील गणांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या २३५ उमेदवारांमध्ये १३६ पुरुष तर १९९ महिला उमेदवार आहेत.२१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार असून सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहे. मात्र अद्यापही निवडणूकीवर अनिश्चिततेचे सावट आहे. निवडणूक हाेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
ओबीसी आरक्षण प्रकरणात निकालाची उत्सुकता- ओबीसी प्रवर्गातील गट आणि गणातील निवडणूक स्थगित केल्यानंतर या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणात १३ डिसेंबरला निकाल अपेक्षीत हाेता. पंरतु सुनावणी एक दिवसाने पुढे ढकलली. मंगळवारी सुध्दा सुनावणी पूर्ण हाेवू शकली नाही. त्यामुळे आता बुधवारी यावर निकाल अपेक्षीत आहे. न्यायालयाचा निकाल काय लागताे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रचाराचा नारळ फुटला- जिल्ह्यातील ३९ गट आणि ७९ गणातील निवडणूकीसाठी उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फाेडला आहे. आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विकासाचा नारा देत उमेदवारांनी रणधुमाळी सुरु केली आहे. लवकरच या निवडणूकीचे वातावरण तापणार आहे. मात्र सर्वांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
ओबीसींच्या भुमिकेकडे लक्ष- आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भुमिका जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी घेतली आहे. आम्हाला मत मागायला येवू नका असे फलकही अनेकांनी घरावर लावले आहे. निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून उमेदवार सावध भुमिका घेत प्रचार करीत आहे. आता न्यायालयाचा निकाल काय येताे आणि ओबीसी संघटना काय भुमिका घेतात याकडे लक्ष आहे.