परवानगीविना वृक्ष कटाईवर २.३० लाखांचा खर्च

By Admin | Updated: September 1, 2016 00:45 IST2016-09-01T00:45:34+5:302016-09-01T00:45:34+5:30

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागावर असली तरी भंडारा वनविभागाच्या कार्यालयातील

2.30 lakhs spent on trees without permission | परवानगीविना वृक्ष कटाईवर २.३० लाखांचा खर्च

परवानगीविना वृक्ष कटाईवर २.३० लाखांचा खर्च

भंडारा वनविभागातील प्रकार : दोषी वनाधिकाऱ्यांना मिळतेय अभय
प्रशांत देसाई भंडारा
पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागावर असली तरी भंडारा वनविभागाच्या कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांची आॅक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात परवानगीविना तोडण्यात आली. या वृक्षतोडीवर वनविभागाने २ लाख २९ हजार ६७९ लाखांचा खर्च केल्याची बाब आता समोर आली आहे. असे असतानाही दोषी वनाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून अभय मिळत आहे.
भंडारा वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील ही वृक्षतोड आॅक्टोंबर व नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय हे भंडारा नगरपालिका क्षेत्रात येते. त्यामुळे वनविभाग वृक्षांचे पालक असले तरी, या वृक्षांची तोड करण्यासाठी वनविभागालाही वृक्षतोडीचे अधिकार नाही.
वनविभागाला अशास्थितीत वृक्षांची तोड करण्यासाठी वृक्षाधिकारी असलेल्या पालिका मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय वृक्षांची तोड नियमबाह्य आहे. असे असतानाही वनविभागाने त्यांच्या कार्यालय परिसरातील साग व अन्य प्रकारच्या वृक्षांची तोड करण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले होते. परंतु पालिकेची परवानगी न घेताच सदर विभागाने वृक्षांची तोड केली. प्रकरण अंगलट येईल या भीतीने वनाधिकाऱ्यांनी पालिकेकडे परवानगीचा पत्रव्यवहार केला. पालिकेने १२ वृक्ष कटाईची परवानगी दिली. मात्र त्यानंतरच्या वृक्ष कटाईसाठी आलेले प्रकरण अद्याप पालिकेकडे पडून आहे. त्यामुळे उर्वरित वृक्षांची केलेली कटाई परवानगीविना केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
परवानगीविना केलेल्या वृक्ष कटाईवर वनविभागाने २ लाख २९ हजार ६७९ हजारांचा खर्च केलेला आहे. अंदाजपत्रकानुसार विभागाीय कार्यालयातील ५७ सागवान, ८० आडजात वृक्षांची तर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील २३ सागवान व ४९ आडजात वृक्षांची अशा ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांची कटाई करायची होती. मात्र, पालिकेने परवानगी दिलेली नसतानाही सुमारे २०० वृक्षांची सर्रासपणे कटाई करण्यात आली.

कटाई व छटाईवर वनविभागाचा खर्च
विभागीय कार्यालयातील वृक्षांच्या कटाईवर १३,८८३ रूपये, छटाईवर २८,९६८ तर देखरेखीवर १२,२१२ असा ५५ हजार ६३ रूपयांचा खर्च केलेला आहे. तर वनपरिक्षेत्र कार्यालयातील खर्च कटाईवर ११,८२५ रूपये, छटाईवर ४३, ७३६ तर देखरेखीवर ११, ६४४ असा ६७ हजार २०५ रूपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. तर वृक्ष कटाईवर वाहतूक खर्च (गडेगांव लाकूड आगार) १४ हजार ४११ रूपये व ट्रॅक्टर भाड्यापोटी ९३ हजारांचा खर्च करण्यात आलेला आहे.
लाकडी साहित्याची परस्पर विल्हेवाट
परवानगीविना वृक्षांची कटाई करण्यात आली. यासह कोका विश्रामगृहाच्या दुरूस्तीनंतर निघालेल्या लाकडी साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. सदर प्रकार उघडकीस येऊन आठवडा लोटला असतानाही उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी याची साधी दखल घेतलेली नाही. उलट काही दिवसापूर्वीच वर्मा यांनी कामात कुचराईपणा केल्याचा ठपका ठेवत दोघांवर निलंबनाची कारवाई केली, हे विशेष. त्यामुळे यातील दोषींवरही कारवाईची अपेक्षा आहे.

Web Title: 2.30 lakhs spent on trees without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.