मृतकाने केले २३ दिवस कामे!

By Admin | Updated: October 27, 2015 00:37 IST2015-10-27T00:37:09+5:302015-10-27T00:37:09+5:30

तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्ते तथा इतर विकास कामात मोठा गैरव्यवहार केला ...

23 days work done by the deceased! | मृतकाने केले २३ दिवस कामे!

मृतकाने केले २३ दिवस कामे!

डोंगरला ग्रा.पं. चा कारभार : चौकशीची ग्रामस्थांची मागणी
तुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्ते तथा इतर विकास कामात मोठा गैरव्यवहार केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. माहितीच्या अधिकारांतर्गत ग्रामस्थांनी माहिती मागितली त्यात सदर प्रकार उघडकीस आला. पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी सुमारे ३०० पानांचा पुरावा सादर केला. येथे एका मृतकाने २३ दिवस मजुरीचे काम केल्याचे प्रकरण उघडकीस आले.
डोंगरला ग्रामपंचायतीने अपंग रामा बनकर यांच्या भूखंडातून रस्ता तयार केला. पूर्वी येथे रस्ता होता हे विशेष. केवळ डागडुजी करण्यात आली. यावर ३ लक्ष ११ हजार ६०० रुपयांचा बिल तयार केला. गावातील सुभाष शिवणकर यांचा मृत्यू सन २०१२ मध्ये झाला होता. परंतु त्यांच्या नावावर सन २०१३ मध्ये २३ दिवस त्यांनी कामे केली असे दाखवून ४,१४० रुपयांची उचल करण्यात आली. याशिवाय सामान्य फंड, बीआरजीएफ, तेरावा वित्त आयोग, ग्रामपंचायत विकास निधीचा नमूना २२ वर अनेक बोगस मजुरांची नावे दाखवून लाखोंचे वेतनाची उचल केली आहे.
मासिक सभेत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर सरपंच व उपसरपंचाने प्रोसीडींग बुकमध्ये खाडाखोड केली. जे नियमबाह्य आहे ग्रामपंचायतीला विजेचे साहित्य उपसरपंच गजानन पटले यांनी आपल्या नातेवाईकाच्या दुकानातून खरेदी करून बिल स्वत: तयार केले तथा हजारो रुपयांची उचल केली. गावातील एका रहिवाशाने घराचे फेरफार करण्याचा अर्ज ग्रामपंचायतीकडे केला होता. त्यांचा फेरफार नियमानुसार करण्यात आले. ग्रामपंचायतमध्ये संबंधित दस्ताऐवज घेण्याकरिता गेले असता त्यांना पैशांची मागणी केली. रुपये न दिल्याने सरपंच तथा उपसरपंचांनी फेरफारमध्ये खाडाखोड केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 23 days work done by the deceased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.