करडीत २२ कामांतून २२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
By Admin | Updated: July 23, 2016 01:15 IST2016-07-23T01:15:46+5:302016-07-23T01:15:46+5:30
करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी विभाग व पंचायत समिती मोहाडी, जि.प. लघु पाटबंधारे ...

करडीत २२ कामांतून २२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
जलयुक्त शिवार योजना : चार विभागांची ९४ लाखांची कामे, शेतकऱ्यांत चैतन्याची बहार
युवराज गोमासे करडी (पालोरा)
करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी विभाग व पंचायत समिती मोहाडी, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा व वनविभाग तुमसरच्या वतीने अंदाजपत्रकीय ९४.०४ लाखांची एकुण २२ कामे करण्यात आली. कामांमुळे २२०.३१ टिएमसी पाण्याची साठवणूक होवून २२१.७१ हेक्टर आर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. करडी गावातील शेतशिवार या कामांमुळे जलयुक्त झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यात व्यक्त होत आहे.
कोका जंगल टेकड्या व वैनगंगा नदी दरम्यान मध्यभागी वसलेला मोहाडी तालुक्यातील करडी गाव कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. गावासभोवती लहान मोठ्या तलावांची व नाल्यांची संख्या अधिक आहे. मात्र तरीही उन्हाळ्यापूर्वीच तलाव कोरडी पडायची. नाल्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट असायचा. शेतकऱ्यांनी विविध योजनांतून विहिरीचे खोदकाम केले. मात्र भूगर्भात कमी जलसाठा असल्याने एक तासही पाणी शेतीला मिळत नव्हते. रिसाळा तलावाचे पाणी गावापर्यंत पाणी पोहचत नव्हते. एका पाण्याने खरीपातील शेती नुकसानग्रस्त व्हायची. पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाणामाऱ्या नेहमीच पहायला मिळायच्या. गाळामुळे तलाव, नाले उथड पडून अतिक्रमण वाढीस लागली होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे परिस्थिती पालटली. शेतशिवारात पाणी दरवळू लागले असून दुष्काळ संपण्यास मदत मिळाली आहे.
पाऊस कमी झालेला असताना यावर्षी धानाची पेरणी लवकर होवून तलाव, नाले, बांध बंधाऱ्या शेजारील शेतकऱ्यांनी विविध साधनांनी पाण्याचा उपसा करून रोवणी आटोपली आहेत. तलाव, नाले, बांध, बंधारे, शेततळे, शेतबोळ्या पाण्याने तुडूंब भरल्यानंतर खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी पिकांना पाण्याचा उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांत चैतन्याची बहार आली आहे. या कामातून निघालेल्या मातीमुळे गावातील अनेक कामे नि:शुल्क झाली, हे विशेष.
पंचायत समिती, मोहाडी
मोहाडी पंचायत समितीच्या मग्रारोहयो अंतर्गत पुनर्जीवनाची ४ कामे पूर्ण करण्यात आली. यात महेंद्र नवखरे, प्रकाश तुमसरे, पुरुषोत्तम सेलोकर, दिपक तुमसरे यांच्या शेतावर झालेल्या कामांचा समावेश आहे. या कामांवर अंदाजपत्रकीय सुमारे १.७५ लाख रुपयापैकी १.६३ लाखांचा निधी खर्ची पडला. त्यामुळे सुमारे ४.७२ हेक्टर आर शेती सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे.
जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग, भंडारा
या विभागामार्फत विकास निधी व महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी अभियानांतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरुस्तीची २ व मामा तलाव दुरुस्तीची १ काम अशी ३ कामे केली गेली. त्यापैकी ३० जून अखेर एका बंधाऱ्याचे काम पूर्ण होवून २ कामे प्रगतीपथावर आहेत. अंदाजपत्रकीय ५०.७४ लाखांची कामे झालीत तर सुमारे ९.७३ लाखांचा निधी आता पर्यंत खर्च झाला. या कामांतून १७४.४६ टीएमसी पाण्याची साठवणूक होण्याचा अंदाज असून १३० हेक्टर शेती ओलीताखाली येण्याची अपेक्षा आहे.
वनविभाग, तुमसर
तर वनविभाग तुमसर अंतर्गत एक साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून अंदाजपत्रकीय २.९३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. अशाप्रकारे करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४ विभागाची २२ कामे झाल्याचे शिवारात पाणी दरवळू लागले आहे.