वाही जलाशयाजवळील घटना : साक्षगंध कार्यक्रमासाठी जाणारे वाहन उलटले पवनी : साक्षगंध कार्यक्रमासाठी पवनीहून नीलजकडे जाणाऱ्या पिकअपव्हॅनचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात १५ जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना शुक्रवारला दुपारी १२.३० च्या सुमारास वाही जलाशयाजवळ घडली.या अपघातात विवेक बाबुराव राऊत (२०) रा. नेरला व शंकर गणपत लेकूरवाडे (६०) रा. भुटानबोरी यांचा जागीच मृत्यू झाला. भुटानबोरी येथील सचिन लेकुरवाडे यांच्या साक्षगंध कार्यक्रमासाठी लेकुरवाडे कुटूंबिय व त्यांचे नातेवाईक पिकअपव्हॅन (एम.एच. ३४ एम ४२०९) मध्ये बसून पुल्लर जि. नागपूर येथे जात होते. पवनीहून निलजकडे जात असताना वाहनचालक आशिष लेकुरवाडे (२८) याचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पिकअपव्हॅन उलटली. जखमींमध्ये सचिन लेकुरवाडे (२२), पांडूरंग शेंडे (२९), लोकेश शेंडे (१७), धुरपता शेंडे (४५), गोदरू शेंडे (४५), अंकुश गुरपुडे (४०), वामन ढेंगरे (६०), आशिष लेकुरवाडे (३०), शैलेश घोसीकर (१२), सोपान भोंगे (२४), बंडु लेकुरवाडे, गोविंदा शेंडे, संतोष लेकुरवाडे, बेबी लेकुरवाडे (५०), अरुण लेकूरवाडे (५०) यांचा समावेश आहे. जखमींवर पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपघातात २ ठार; १५ जखमी
By admin | Updated: February 13, 2016 00:17 IST