खरबीच्या विदर्भ सहकारी पतसंस्थेत १९ लाखांचा अपहार
By Admin | Updated: February 2, 2017 00:21 IST2017-02-02T00:21:35+5:302017-02-02T00:21:35+5:30
खरबी येथील दि विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेत नित्यनिधी ठेवची अफरातफर करण्यात आली.

खरबीच्या विदर्भ सहकारी पतसंस्थेत १९ लाखांचा अपहार
व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल : लेखा परीक्षक सुपे यांची तक्रार
भंडारा : खरबी येथील दि विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेत नित्यनिधी ठेवची अफरातफर करण्यात आली. १८ लाख ८९ हजार ८९० रुपयांची अफरातफर झाल्याची बाब अंकेक्षण अहवालात स्पष्ट झाल्याने लेखा परिक्षक श्रीकांम सुपे यांच्या तक्रारीवरून पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक खेमदेव देशमुख यांच्याविरुध्द जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरबीच्या या संस्थेने ग्राहकांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून नित्यनिधी ठेव व बचत खात्यात पैसे जमा केले. या व्यवहारात पत संस्थेने शेकडो ग्राहकांकडून जमा केलेल्या रक्कमेत मोठी अफरातफर केल्याचा आरोप यापूर्वी अनेकांनी तक्रारीतून केला होता. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक क्षिरसागर यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ श्रीकांत सुपे यांना फेरअंकेक्षण व चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते.
आदेशानुसार श्रीकांत सुपे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद यांची चौकशी केली. फेर अंकेक्षण सन २०११ ते २०१५ या तर चाचणी लेखापरिक्षण २००२ ते २०११ या वित्तीय वर्षातील करण्यात आले.
यात नित्तनिधी ठेव अंतर्गत बचत अभिकर्त्यांच्या माध्यमातून खातेदारांकडून गोळा केलेली रक्कम संस्थेच्या मुख्य किर्दबुकला (कॅशबुक) केली नाही. या कारनाने संस्थेच्या व्यवहारातही ही रक्कम नमूद करण्यात आली नाही. या अंकेक्षण अहवालात पतसंस्थेचे व्यवस्थापक खेमदेव देशमुख हे जबाबदार असून त्यांनी १८ लाख ८९ हजार ८९० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी श्रीकांत सुपे यांनी आज जवाहरनगर पोलिसात खेमदेव देशमुख यांच्या विरोधात ग्राहकांच्या पैशांची अपहार केल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणाने पतसंस्था प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून आणखी काही माशे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)