१८५ पदे रिक्त ; आरोग्य विभाग खिळखिळे
By Admin | Updated: December 13, 2014 00:56 IST2014-12-13T00:56:58+5:302014-12-13T00:56:58+5:30
सार्वजनिक आरोग्याची सर्वांगीण हमी घेणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अंबार आहे.

१८५ पदे रिक्त ; आरोग्य विभाग खिळखिळे
इंद्रपाल कटकवार भंडारा
भंडारा : सार्वजनिक आरोग्याची सर्वांगीण हमी घेणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अंबार आहे. परिणामी त्याचा सरळ फटका रूग्ण सेवेवर होत आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागासह सामाण्य रूग्णालय प्रशासनातील एकूण १८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेषत: तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांची संख्या जास्त असल्याने समस्येने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.
आरोग्य सेवेचा कणा असलेल्या कर्मचारी पदांचा अनुशेष कायम आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग १ ची तीन पदे रिक्त आहेत. यात अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दोन तर जिल्हा लस टोचणी अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. वर्ग दोन मधील प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांचे प्रत्येकी एक पद तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे तीन पद, वैद्यकीय अधिकारी गट (अ) मधील पाच पदे तर गट (ब) मधील एक पद रिक्त आहेत. यात राज्य स्तरावरील रिक्त पदे भरण्याची कारवाई सरळ शासनामार्फत करण्यात येते. मात्र मागील चार वर्षांपासून या आकड्यांमध्य फार मोठी घट झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती स्तरावरील सात आरोग्य केंद्रांचा कारभार बघितला जातो. यात तांत्रिक कर्मचाऱ्यांची एकूण १४ तर अतांत्रिक कर्मचाऱ्यांची एकूण ३० पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक (स्त्री), आरोग्य पर्यवेक्षक (पंचायत स्तर), कनिष्ठ सहायक, परिचर, अंशकालिन स्त्री परिचरांच्साी पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकूण ५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी ४७ पदे भरलेली असून ९ पदे रिक्त आहेत. सामाण्य रूग्णालय प्रशासनाच्या अधिनस्थ जिल्हा सामाण्य रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयचा डोलारा आहे. ग्रामीण केंद्रातील व तिन्ही रुग्णालयातील कारभार सांभाळायला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची गरज आहे. रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. वर्ग १ ची सात पदे, वर्ग २ ची ३ पदे, वर्ग ३ ची २६ पदे तर वर्ग ४ ची ८० पदे रिक्त आहे.