१.८४ लाख मजुरांना मिळाला रोजगार
By Admin | Updated: May 12, 2017 01:46 IST2017-05-12T01:46:12+5:302017-05-12T01:46:12+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दिड महिन्यात भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ८४ हजार ४८८ मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

१.८४ लाख मजुरांना मिळाला रोजगार
८७ हजार ८१२ कुटुंबाची नोंद : १४ कोटींची मजुरी वाटप, रोजगार हमी योजना
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दिड महिन्यात भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ८४ हजार ४८८ मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मजुरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मजुरांना रोजगार मिळणे ही बाब उत्तम असली तरी यात बहुतांश शेतकरी रोहयाच्या कामावर असल्याचे समजते.
उन्हाळी धान हंगाम अंतीम टप्यात असतांनाच जिल्ह्यातील मजूरांना कामे उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत या मजुरांकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची मागणी सातत्याने होत असते. प्रशासनाकडूनही संबंधित मजुरांकडून विशेषत: ग्रामपंचायतीकडून मजुरांचे जॉबकार्ड मागविले जातात. या आधारावर सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत २ लक्ष ६ हजार ०३१ कुटूंबानी नोंदणीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ५ लक्ष ७१ हजार २२१ मजुरांची नोंदणी करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षरित्या कामावर ८७ हजार ८१२ कुटूंबापैकी १ लक्ष ८४ हजार ४८८ मजूर कामावर आहेत. विशेष म्हणजे कामावर असलेल्या या उपरोक्त मजुरांना मजुरीपोटी १४ कोटी ८ लक्ष रुपये अदा करण्यात आले आहे.
सर्व मजुरांची मजूरी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. या प्रणालीत आधार कार्डाची भूमिका महत्वाची आहे. एखाद्या मजुराने कार्य केल्यानंतर १५ दिवसाच्या आत मजुरी मिळने गरजेचे आहे. मजुरांनी काम केलेल्या व प्रशासनाने त्यांची मजूरी दिल्याची टक्केवारी ९५.६१ इतकी आहे.
मागीलवर्षी २.७५ लाख मजूर कामावर
रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २ लक्ष ५ हजार ७७५ कुटूंबानी कामासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लक्ष ७८ हजार २६९ मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. शासनाने मजुरी पोटी ७४ कोटी ६९ लक्ष ३९ हजार रुपये वाटप केले होते. त्या सत्रात ५५ लक्ष १४ हजार ५४ इतके मनुष्यदिवस कामावर हजर असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्याची व यशस्वी करण्याची खरी जबाबदारी कंत्राटी कर्मचारी सांभाळीत आहेत.