पाणीटंचाई निवारणार्थ ३३ गावात १७८ योजना

By Admin | Updated: May 26, 2017 02:04 IST2017-05-26T02:04:44+5:302017-05-26T02:04:44+5:30

वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने यावर्षी पवनी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने

178 schemes in 33 villages for water shortage prevention | पाणीटंचाई निवारणार्थ ३३ गावात १७८ योजना

पाणीटंचाई निवारणार्थ ३३ गावात १७८ योजना

पवनी तालुका : सहायकांची बदली, मान्सूनच्या तोंडावर कामांची लगीनघाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने यावर्षी पवनी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ ३६ गावांमध्ये १७८ योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. पंचायत समिती स्तरावरून पूर्ण करावयाच्या कित्येक योजना पूर्ण झालेल्या आहेत. मात्र पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने पाणी टंचाईचे सावट पूर्णत: दूर झालेले नाही.
पाणी टंचाई निवारणार्थ प्रस्तावित करण्यात आलेल्या योजनामध्ये नवीन विंधन विहीर २६ गावात ५६, कुपनलिका ३ गावात ३, विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती १७ गावात ३२, नळ योजनेची विशेष दुरूस्ती २२ गावात २३, तात्पूरती पुरक नळ योजना एक, विहीर खोलीकरण, गाळ काढणे ३६ गावांमध्ये ६३ अशा एकूण ३६ गावांसाठी १७८ योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी कित्येक योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यानुसार तालुक्यातील खैरी दिवाण, इटगाव, भोजापूर, रेवणी, सिंधी, पाथरी, मोहरी, लावडी, आकोट, बाचेवाडी, विरली खंदार, उमरी अड्याळ, नवेगाव पाले, धानोरी, खापरी भुयार, आमगाव आदर्श सेंद्री बुज, मिन्सी, सोमनाळा खुर्द, चिखली गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. बृहत आराखड्यास मंजुर करून संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आलेली आहे.
पवनी पंचायत स्तरावरून करावयाचीकामे पूर्ण करण्यात आलेल असून जिल्हा परिषद स्तरावरील कामे प्रगती पथावर आहेत. पंचायत समिती स्तरावर कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहे.
यातील सहायकांची बदली झालेली आहे. त्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागणार आहे. अशा वेळी पंचायत समितीचे बांधकाम विभाग पोरके होणार असल्याची चर्चा आहे.


प्रभाग क्रमांक १० मध्ये भीषण पाणीटंचाई
भंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. सदर परिसरातील पाणीटंचाईची समस्या न सोडविल्यास नगरपरिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेविका शुभांगी लोकेश खोब्रागडे यांनी दिला आहे. या आशयाचे निवेदन नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांना देण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत रमाबाई आंबेडकर वॉर्ड, संत ज्ञानेश्वर वॉर्ड, कपिलनगर, साईनाथनगर आदी क्षेत्राचा भाग येतो. आंबेडकर वॉर्डातील विद्यानगर, सत्कारनगर परिसरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, नगरपरिषदेचे गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील नळ कनेक्शन त्वरीत बंद करण्यात यावे, पटवारी भवन परिसरात असलेल्या पंपगृहात जलकुंभ बसविण्यात यावे, योगेश भुरे यांच्या घरासमोरील बोरवेलचा उपसा करणे, अरुण अंबांदे यांच्या घरासमोर बोरवेल तयार करणे, संत ज्ञानेश्वर वॉर्डतील नहाले यांच्या घराशेजारील व मनिष मते यांच्या घरासमोरील बोरवेलचा उपसा करणे तसेच कपीलनगरातील बगीचा परिसरात असलेल्या बोरवेलवर पंपगृह निर्माण करून पाण्याची टाकी निर्माण करणे, बौद्ध विहार परिसरात नवीन बोरवेल्सची निर्मिती करणे व साईनाथ नगर येथील तुपकर यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक विहिरीवर पंपगृह बनवून पाण्याची टाकी निर्माण करणे आदींची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरसेविका शुभांगी खोब्रागडे यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत मागण्यांची पुर्तता न झाल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.

कोंढीत अशुद्ध पाणीपुरवठा
जवाहरनगर : तालुक्याच्या पश्चिम टोकावर वसलेले व कन्हान नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेले कोंढी हे पुरातन गाव. या गावातील लोकसंख्या सुमारे चार हजाराच्या घरात आहे. राजकीय चळवळीचे हे एक गाव म्हणून गणल्या गेले. मात्र येथे शुद्ध पाण्याचा अभाव दिसून येतो. आज घडीला टंचाईकृती आराखड्यांतर्गत बोर करून गावात तुटपुंज अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्यासाठी योग्य स्त्रोत कन्हान नदीजवळ असताना सुद्धा शुद्ध पाणीपुरवठ्याची सोयी सुविधा नाही.
जनतेला विशेष करून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्यात यावे. गावात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत कोंढी, सावरी, राजेदहेगाव, इंदिरानगर, खराडी, खरबी, चिखली या गावांसाठी मोठ्या स्वरूपांची जलशुद्धीकरण युक्त पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: 178 schemes in 33 villages for water shortage prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.