न्यायासाठी शिक्षिकेची १७ वर्षांपासून पायपीट
By Admin | Updated: August 26, 2014 23:39 IST2014-08-26T23:39:04+5:302014-08-26T23:39:04+5:30
पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शिक्षिका उषा रामंचंद्र कुंभारे यांना शाळा व्यवस्थापनाने सेवामुक्त केले. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने कुंभारे यांना

न्यायासाठी शिक्षिकेची १७ वर्षांपासून पायपीट
भंडारा : पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शिक्षिका उषा रामंचंद्र कुंभारे यांना शाळा व्यवस्थापनाने सेवामुक्त केले. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने कुंभारे यांना शाळेत पूर्ववत रुजू करण्याचे आदेश दिले, मात्र शाळा सचिवाने त्यांना रुजू न केल्याने त्या मागील १७ वर्षांपासून न्यायासाठी पायपीट करीत आहे.
उषा कुंभारे ह्या १९९४ मध्ये पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात सहायक शिक्षिका या पदावर रुजू झाल्या होत्या. १४ आॅगस्ट १९९६ ला संस्थेनी त्यांना नाहक सेवामुक्त केले. संस्थेच्या या सेवामुक्तीच्या आदेशाविरूध्द कुंभारे यांनी शाळा न्यायधिकरणाकडे आव्हाण दिले. १७ वर्षानंतर निकाल कुंभारे यांच्या बाजूने देताना सेवामुक्तीचा आदेश रद्दबातल ठरवून त्यांना पूर्ववत शाळेत नियुक्त करण्याचे आदेश दिले.
या आदेशाविरूध्द शाळा व्यवस्थापन कमिटीने शाळा न्यायधिकरणाच्या विरुध्द स्थगिती मागितली. मात्र उच्च न्यायालयाने शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्याचे नाकारून स्थगनादेश फेटाळून लावला. न्यायालयीन निर्णयाचे आदेश घेऊन कुंभारे ह्या शाळेत रुजू होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र मुख्याध्यापिका कचरा खोबरागडे व संस्था सचिव राहुल गजभिये यांनी सेवेत रुजू करण्यास नकार दिला. याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशासह शाळेची तक्रार केली. यावरून शिक्षणाधिकारी यांनी शाळेला रुजू करण्याचे आदेश दिले. तरीही शाळा व्यवस्थापन कमिटीने कुंभारे यांना सेवेत सामावून घेतले नसून शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाही धुडकावून लावल्याचा आरोप उषा कुंभारे यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)