वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By Admin | Updated: August 13, 2014 23:38 IST2014-08-13T23:38:35+5:302014-08-13T23:38:35+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
संजय साठवणे - साकोली
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने १७ पैकी नऊ प्रकरणे अपात्र ठरविली असून सात प्रकरणे प्रलंबित ठरविण्यात आलेली आहेत.
मागीलवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रोवणी अजूनही शिल्लक आहेत. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतले आहे. मात्र यावर्षीच्या पिकाची हमी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. साकोली तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नाही.
१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुमोद कांबळे (४५) रा.धर्मापुरी (साकोली), यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. दर्याव बिसने (६५) केसलवाडा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नामदेव पचारे (५०) रा.लाखनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम दोनोडे (४२), परसटोला (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत झिंगरे (३२) रा.पालांदूर (लाखनी) पाण्यात मृतावस्थेत आढळून आले.
महादेव पराते (३८) रा.उमरझरी (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दयाराम कोळे (४५) रा.पळसगाव (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत मेश्राम (५२) रा.खेडेपार (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. माधोराव लांजेवार (६८) रा.निलागोंदी (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. राजेंद्र विठोले (४०) रा.तामसवाडी (तुमसर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. रमेश रहांगडाले (३६) रा.एकोडी (किन्ही) साकोली हे मृतावस्थेत आढळून आले. हरिहर गहेरवार (३५) रा. मेंढा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सीताराम भागडकर (५५) रा.करांडला हे शेतात मृतावस्थेत आढळून आले.
रामचंद्र चौधरी (६७) रा.लाखांदूर हे मृतावस्थेत आढळून आले. ज्ञानेश्वर मिसार (४०) रा.डोकेसरांडी (लाखांदूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिसन गिरीपुंजे (६५) रा.किन्ही (साकोली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बळीराम उईके (७७) रा.पवनारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद आहे. यात साकोली व लाखनी तालुक्यातील सर्वाधिक आहेत.
मृतकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत यशवंत मेश्राम रा.खेडेपार या एकाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रकरण पात्र ठरले. ७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.