१७ गावांच्या विकासाला ‘ब्रेक’
By Admin | Updated: May 14, 2014 01:39 IST2014-05-13T23:18:35+5:302014-05-14T01:39:40+5:30
गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील ८५ गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आतापर्यंत यातील १७ गावांचे दुसऱ्या

१७ गावांच्या विकासाला ‘ब्रेक’
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील ८५ गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आतापर्यंत यातील १७ गावांचे दुसर्या ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. मात्र त्यांना महसूल गावांचा दर्जाच दिला नसल्याचे गावातील विकास प्रक्रियांनाच ब्रेक लागला आहे.
गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्यातील ५१ आणि भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील गावांचे नागपूर जिल्ह्यात आणि भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातच पुनर्वसन होणार आहे. ८५ गावांचे ६४ ठिकाणी पुनर्वसन होत असून यातील १७ गावांचे स्थलांतरण करण्यात आले.
स्थलांतरण होवून काही गावांना तीन वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्यांना अद्याप महसूल गावांचा दर्जाच देण्यात आला नाही. नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट, घाटउमरी, गोहल्ली, नांदीखेडा, सोनेगाव, अंभोरा खुर्द, अंभोरा कला, गडपायली, नवेगाव आणि भंडारा जिल्ह्यातील मेंढा, मालशी, पेंढरी, सावरगाव, मकरधोकडा, शिरजघाट, खोलापूर या स्थलांतरीत गावांना त्वरीत मसहूल गावाचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महसूल गावाचा दर्जा न मिळाल्याने या गावातील अनेक कामे रखडली आहेत. सात बारा मिळणेही अवघड झाले आहे. प्लॉटची मालकी मिळू शकली नाही. निवडणुकाही होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेवून ही प्रक्रिया पुर्ण करावी, अशी मागणी गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांचे विलास भोंगाडे यांनी केली आहे. गावांनी प्रस्ताव सादर करावा. महसूल गावे घोषीत करण्यासाठी स्थलांतरीत गावांनी तसा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक गावांनी यासाठीचे प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यांना त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)