जिल्ह्यात १,६६३ धार्मिकस्थळे अनधिकृत!
By Admin | Updated: April 28, 2016 00:22 IST2016-04-28T00:22:36+5:302016-04-28T00:22:36+5:30
भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक अथवा सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी सुरू आहे.

जिल्ह्यात १,६६३ धार्मिकस्थळे अनधिकृत!
तीन श्रेणीत करणार विभागणी : स्थानांतरण, नियमितीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन
भंडारा : भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक अथवा सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने गठित केलेल्या समितीने गृह विभागाच्या निर्णयाचा हवाला देऊन १ मे १९६० ते २९ सप्टेंबर २००९ पर्यंत अस्तित्वात असलेले अनधिकृत धार्मिक स्थळांचे तीन वर्गात सूची तयार केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या १,६६३ इतकी आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या माहितीसाठी १६ एप्रिलपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते.
सर्वेक्षणानंतर कृती आराखडा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातंर्गत सार्वजनिक किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून २९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेले अनधिकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, निष्कासन आणि स्थलांतरणासाठी जिल्हास्तरीय समितीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात अनधिकृत १,६६३ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. यासाठी शहरी क्षेत्रातील नगरपालिका आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीकडून सर्वेक्षण करण्यात आले.
पोलीस प्रशासनाशी चर्चा करून १,६६३ धार्मिक स्थळांची यादी जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात आली. त्याची पडताळणी करून समितीने त्या सर्व धार्मिक स्थळांना ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यात आले. ‘अ’ श्रेणीतील धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, ‘ब’ श्रेणीतील निष्कासन आणि ‘क’ श्रेणीतील स्थळांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यासंबंधी १६ मार्च रोजी अधिसूचना काढून १६ एप्रिलपर्यंत आक्षेप मागविले होते.
पवनीतील गरूड खांंब हटविणार !
जिल्ह्यात निष्कासन योग्य धार्मिक स्थळांची ‘ब’ श्रेणीतील संख्या आठ आहे. यात चार मंदिर, दोन दरगाह आणि दोन पुतळ्यांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय महामार्गाच्या काठावर आणि महामार्ग विस्तारीकरणासाठी धार्मिक स्थळ हटवावे लागणार आहे. तुमसर तालुक्यातील डोंगरी (बुज), राजापूर आणि पवनारखारी (हमेशा) येथे एक-एक धार्मिक स्थळ वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे.
‘क’ श्रेणीतील संख्या २३ असून त्यांच्या स्थलांतरण करण्यात येणार आहे. महामार्ग विस्तारीकरणासाठी जिल्हास्तरीय समितीने स्थलांतरण करण्याचे ठरविले. यात भंडारा शहरातील देशबंधु वॉर्ड, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, खात रोड, वैशाली नगर, हेडगेवार चौक, राजगोपालाचारी वॉर्ड, मिस्किन टँक, तकिया वॉर्ड आणि शास्त्री चौकस्थित १० मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय पवनी येथील चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा, गोडेघाट वॉर्डस्थित मारूती मंदिर आणि विठ्ठल गुजरी वॉर्ड स्थित प्राचीन गरूड खांब या स्थळांचे स्थलांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तुमसर शहरात सरदार वार्ड, विवेकानंद नगर, अभ्यंकर नगर, श्रीराम नगर, आजाद नगर, रविदास नगर आणि गोवर्धन नगरस्थित १० मंदिरांचे स्थालांतरण करण्यात येईल. ‘अ’ श्रेणीतील १,६३२ धार्मिक स्थळांना त्याचठिकाणी नियमित करण्यात येणार आहे.
सुनावणीनंतर होणार कारवाई
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सूचीबद्ध १,६६३ अनधिकृत धार्मिक स्थळ नियमितीकरण, निष्कासन किंवा स्थलांतरणासाठी विचाराधीन आहे. जिल्हास्तरीय समितीने निष्कासन केलेल्या स्थाळांची माहिती राज्य समितीकडे पाठविणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)