कंत्राटदाराने केले १.६६ कोटी रूपये फस्त
By Admin | Updated: March 24, 2017 00:29 IST2017-03-24T00:29:27+5:302017-03-24T00:29:27+5:30
गोसेबुज स्थित उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युतीकरणाचे १.६६ कोटी रूपयांची देयके

कंत्राटदाराने केले १.६६ कोटी रूपये फस्त
कार्यकारी अभियंत्यांची तक्रार : अड्याळमध्ये गुन्हा दाखल, गोसेबुज उपसा सिंचन योजनेच्या बांधकामाचे साहित्य लंपास
भंडारा : गोसेबुज स्थित उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युतीकरणाचे १.६६ कोटी रूपयांची देयके देऊनही कामे पूर्ण न करता कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कार्यकारी अभियंता प्रदीप कापसे यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे विद्युत ठेकेदार चंद्रशेखर क्रांतीकुमार खराबे (३८) रा.छिंदवाडा रोड, नागपूर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंत्यांची तक्रार आणि पवनी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातंर्गत येणाऱ्या गोसेबुज उपसा सिंचन योजनेचे कंत्राट चंद्रशेखर खराबे यांच्याकडे डिसेंबर २०११ पासून आहे.
प्रकल्पाच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युुतीकरणाच्या कामाचा त्यांच्याशी करारनामा झालेला होता. त्याअंतर्गत पंपगृहाच्या पूर्ण झालेल्या बांधकामाचे ५३ लाख ९८ हजार २५८ आणि पंपगृहाच्या साहित्यासाठी ९३ लाख १० हजार ४८ रूपये आणि चोरी गेलेल्या साहित्यासह असे एकूण १ कोटी ५६ लाख ३ हजार ९३३ रूपयांची देयके १८ मार्च २०१४ रोजी त्यांना देण्यात आले. याशिवाय वाढीव दरानुसार १० लाख ८२ हजार ७४१ रूपयांचे अतिरिक्त देयके देण्यात आले होते. परंतु आरोपी कंत्राटदार खराबे याने करारनाम्यानुसार देण्यात आलेली कामे पूर्ण केली नाही.
या बांधकामासाठी आणण्यात आलेले लाखो रुपयांचे साहित्यही या कंत्राटदाराने वाहनात कोंबून घेऊन गेले. या सर्व बांधकामात कंत्राटदार खराबे याने १ कोटी ६६ लाख ८६ हजार ६७४ रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डावा कालवा वाही विभागचे कार्यकारी अंभियंता प्रदीप कापसे यांची लेखी तक्रार आणि पवनी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून अड्याळ पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर खराबे याच्याविरूद्ध भादंवि ४०६ व ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक डोंगरे हे करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)