१६ वर्षांपासून नळ योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असून गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष ...

१६ वर्षांपासून नळ योजना बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असून गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावात नळ योजनेसाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली. परंतु अद्यापही येथे नळ योजना सुरू झाली नाही.
यासाठी लोकप्रतिनिधींना अनेकदा भेटून निवेदने देण्यात आली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन ६ ते ७ महिन्यापूर्वी गावात नळयोजनेच काम करण्यात आले होते. आजही महिला २ किलोमीटर अंतराहून पिण्याचे पाणी डोक्यावर गुंड घेऊन आणतात. यात अनेक वृद्ध महिलांना आजारपणामुळे पाणी आणायला जमत नसल्याने त्यांना पाण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो.
परसवाडा ग्रामस्थांना क्षारयुक्त व अशुद्ध पाणी पिऊन दिवस काढावे लागत आहेत. यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन अनेक आजारामूळे आयुष्मान कमी होत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असते.
जीवनाश्यक गरज असणाऱ्या पाण्यासाठी गावकऱ्यांना आजही पायपीट करावी लागत आहे.
गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनाने अजूनही विशेष लक्ष दिलेले नाही. तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री पेयजल योजनेत हस्तांतरित करून नळ योजना सुरू करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना मुंबई येथे मंत्रालयात शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख नितीन सेलोकर, युवक बेरोजगार समितीचे संयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, युवासेना खापा जिल्हा परिषद क्षेत्र विभाग समन्वयक पवन खवास यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.