१६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
By Admin | Updated: March 12, 2017 00:38 IST2017-03-12T00:38:51+5:302017-03-12T00:38:51+5:30
लाखांदूर येथील एका १६ वर्षीय मुलीला जबरीने जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

१६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
लाखांदूर येथील प्रकार : सोशल मीडियावर चित्रफित व्हायरल
भंडारा : लाखांदूर येथील एका १६ वर्षीय मुलीला जबरीने जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चार ते पाच दिवसापूर्वीची आहे. अत्याचारी युवकांनी सामूहिक अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार करून ती सोशल मिडीयावर व्हॉयरल केल्याने हे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे.
लाखांदूर शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील हे युवक २० वर्ष वयोगटातील आहेत. पाच युवकांच्या हे टोळके असून शहरातील गरीब व पैशाच्या अडचणीत असलेल्या मुलींच्या शोधात असतात. मागील अनेक दिवसांपासून या युवकांनी लाखांदुरातील एका मुलीवर वाईट नजर ठेवून तिचा अनेक दिवसांपासून पाठलाग सुरू होता. मागील आठवड्यातील या युवकांनी तिला प्रलोभण दिले. मात्र, त्यांच्या प्रलोभणाला दाद न दिल्याने युवकांनी तिला लाखांदुरपासून १२ किमी अंतरावरील चारभट्टी जंगलात नेले. यावेळी युवकांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यांच्यातीलच एकाने या अत्याचाराची मोबाईलवरून चित्रफित काढली. ही चित्रफित युवकांनी व्हॉट्सअप या सोशल मिडीयावर व्हॉयरल केली आहे.
सामूहिक अत्याचाराची ही चित्रफित व्हॉयरल केल्याने लाखांदुरातील अनेकांच्या मोबाईलवर ती व्हॉट्सअपवर बघितली जात आहे. याप्रकाराने पीडित मुलगी भयभीत झालेली आहे. दरम्यान अत्याचारी युवकांनी पीडित मुलीला पोलिसात तक्रार न करण्याची धमकी दिल्याचे समजते. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा आता लाखांदुरात व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
सामूहिक अत्याचाराची चर्चा एैकाला मिळाली आहे. खरोखरचं मुलीवर अत्याचार झाला असल्यास पोलिसात तक्रार दाखल करावी. नियमानुसार आरोपींवर कारवाई करण्यात येईल.
- सुरेश धोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखांदूर.