पोळ्याची १५८ वर्षांची परंपरा परसोडीत कायम
By Admin | Updated: September 1, 2016 00:49 IST2016-09-01T00:49:08+5:302016-09-01T00:49:08+5:30
परसोडी (जवाहरनगर) येथे इंग्रज राजवटीपासून म्हणजे सन १८५८ पासून या ठिकाणी दरवर्षी ऐतिहासिक पोळा भरतो.

पोळ्याची १५८ वर्षांची परंपरा परसोडीत कायम
झडत्यांनी गुंजणार परिसर : सर्जा-राजाला पुरण पोळीचा नैवेद्य
प्रल्हाद हुमणे जवाहरनगर
परसोडी (जवाहरनगर) येथे इंग्रज राजवटीपासून म्हणजे सन १८५८ पासून या ठिकाणी दरवर्षी ऐतिहासिक पोळा भरतो. हा पोळा विदर्भात प्रसिद्ध आहे. पिढ्यानपिढ्या हा पोळा येथील सर्वधर्म समभावनेतून जपल्या जात आहे.
परसोडी येथे पूर्वी वंजारी, गुप्ते, हटवार, डोरले, पडोळे, मोटघरे, मेश्राम, सुखदेवे यांची घरे होती. गजानन महाजन यांची वतनदारी सावरी - ठाणा - नांदोरा येथे होती. गुप्ते पाटलांची वतनदारी परसोडी, बाचेवाडी, सिरसुली, किन्ही, एकोडी येथे होती. आजही परसोडी येथे महाजन यांचा व गुप्ते पाटलांचा वाडा अस्तित्वात आहे. या वाड्यासमोर पूर्वी बैलांचा पोळा उत्साहात साजरा करण्यात येत होता. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांद शेकले जातात. पोळ्याच्या दिवशी बैलांना रंगरंगोटी करून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आंब्याच्या तोरणाखाली शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत उभे राहायचे. यात गुप्ते पाटलांची १२ जोडी व गजानन महाज यांची १५ जोडीचा समावेश राहत होते.
पोळ्यानिमित्त पारंपारिक झडत्या म्हटल्या जात असे. पोळा पंचकमेटीचे अध्यक्ष मारोतराव हटवार यांनी सांगितले की, त्यांचे वडील व प्रथम सरपंच भिवा हटवार व दपटू डोरले यांनी हा पोळा टिकवून ठेवला. परसोडी गावची सध्याची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. सन १९८० पासून बैलांच्या सजावटीसाठी विशेष बक्षिस देण्याला प्रारंभ झाला. यामुळे ऐतिहासिक पोळ्याला महत्व प्राप्त झाले.
या काळामध्ये दीडशे ते दोनशे बैलांच्या जोड्या सहभागी होत असत. यांत्रीकी युगामुळे आज ही संख्या शंभराच्या घरात असतो. मात्र गावकऱ्यांनी पोळ्याला खंड पडू दिले नाही. हा पोळा पाहण्यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यामधून नागरिकांची गर्दी असते. गावात तीन दिवस जत्रेचे स्वरुप असते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य कुस्तीची आम दंगल, महिलांसाठी विविध स्पर्धा घेतली जातात. तर सायंकाळी ५ वाजता लहान बालगोपालांसाठी मखराचा म्हणजे तान्हा पोळाचे आयोजन करण्यात येते. मागच्या वर्षी विक्रमी सुमारे चारशे लाकडी ताना बाल कास्तकारांनी हजेरी लावली. विद्युत प्रकाश झोतात लाकडी ताना बैल न्हाऊन निघाली होती. पोळा पंच कमेटीतर्फे त्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येते. या गावातील महिला पुरुष तिन्ही दिवशी महाराष्ट्रीयन पोशाखात वावरताना दिसतात.