१५ टक्के लागवडक्षेत्र पडित
By Admin | Updated: September 17, 2016 00:58 IST2016-09-17T00:58:29+5:302016-09-17T00:58:29+5:30
मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे.

१५ टक्के लागवडक्षेत्र पडित
पाऊस आला तरीही निराशाच : सरासरी ६९ टक्के पाऊस
भंडारा : मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या बळीराजावर वरूणराजा प्रसन्न होवून शेतातील धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. परंतु दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेची तग धरू न शकणाऱ्या जवळपास १५ टक्के धानक्षेत्रातील जमीन रोवणीअभावी पडीत राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी पाऊस बरसला पण...त्याचा मेलेल्या धनाच्या पेंढींना उपयोग काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या भरवश्यावर उत्पादन अधिक होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने सुरूवातीला व मध्यांतरी असा दोनवेळा दगा दिला. पोळ्यापूर्वी बरसणारा वरूणराजा गणेशोत्सवात बरसला.
धानपिकाला संजीवनी मिळाली. पावसाच्या अपेक्षेत रखडलेलेली रोवणी शेवटपर्यंत झाली नाही. जमिनीला भेगा पडल्या. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पाऊस बरसला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जी स्थिती होती, त्यात काही बदल झाला असला तरी गरजेच्या वेळी पाऊस न बसरल्याने रोवणीच्या प्रतीक्षेत असलेली रोपे कोमेजून नष्ट झाली. याचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
धान्य उत्पादनावर किती परिणाम होईल ही बाब येणारी वेळ ठरविणार असली तरी, सध्या तरी बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात ही चिंता वरूणराजाच्या आगमनाने दुर झाली होती. आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली काय? अशी स्थिती आहे. पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (प्रतिनिधी)