आंतरराज्यीय मार्गावर १३ वीज खांब जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:53 IST2018-11-10T21:52:36+5:302018-11-10T21:53:09+5:30
शहराच्या मध्यवस्तीतून मध्यप्रेदशात जाणाऱ्या कटंगी या आंतरराज्यीय मार्गावर असलेले विजेचे १३ खांब अपघाताला आमंत्रण देत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते.

आंतरराज्यीय मार्गावर १३ वीज खांब जीवघेणे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहराच्या मध्यवस्तीतून मध्यप्रेदशात जाणाऱ्या कटंगी या आंतरराज्यीय मार्गावर असलेले विजेचे १३ खांब अपघाताला आमंत्रण देत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते.
तुमसर शहरातून कटंगी हा आंतरराज्यीय मार्ग जातो. या मार्गावर जुने बसस्थानक ते रेल्वे टाऊनच्या मुख्य गेटदरम्यान १३ वीज खांब आहेत. सदर खांब मुख्य रस्त्यालगत अगदी तीन ते चार फुटावर आहे. हा आंतरराज्यीय मार्ग असल्याने वर्दळ सुरू असते. शहरातून कटंगी मार्गे मध्यप्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. रेल्वे प्रशासनाने त्या मार्गावर टाऊन ते जुना साईबाबा चौकातील ३०० मीटर लांबीची सुरक्षा भिंती बांधली आहे. मात्र त्यादरम्यान विजेचा पुरवठा करणारे १३ खांब चक्क मुख्य मार्गावर आले आहेत. या मार्गाने मॉईल प्रशासनाची जड वाहतूक, खाजगी वाहतूक अहोरात्र सुरू असते. या मार्गावरील डाव्या बाजूने होणारी वाहतूक या खांबामुळे असुरक्षित झाली आहे.
तुमसर शहरातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्था उपजिल्हा रुग्णालय याच मार्गावर आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी हाच प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर एकाचवेळी गर्दी होते. अशास्थितीत रस्त्यालगतचे खांब अपघास आमंत्रण देत आहे. विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना सुरक्षा भिंतीमुळे अनेकदा दिसत नाही. रात्रीच्यावेळी वाहतूकदारांची त्रेधा उडते.
वीज वितरणचे दुर्लक्ष
वीज वितरण कंपनीकडे या खांबाबाबत वारंवार सुचना देवूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. आतापर्यंत अनेकदा लहान अपघात झाले आहेत. वीज वितरण कंपनी मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहेत काय, असा सवाल तुमसर येथील नागरिक करीत आहे.