ग्राहक मंचची १२७ प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: March 15, 2015 00:50 IST2015-03-15T00:50:36+5:302015-03-15T00:50:36+5:30
जिल्ह्यात मार्च १९९१ मध्ये जिल्हा ग्राहक मंचाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत ४,१६८ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे़ यापैकी ४,०४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे़

ग्राहक मंचची १२७ प्रकरणे प्रलंबित
भंडारा : जिल्ह्यात मार्च १९९१ मध्ये जिल्हा ग्राहक मंचाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत ४,१६८ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे़ यापैकी ४,०४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे़ उर्वरित १२७ प्रकरणांवर कारवाई सुरू आहे़
ग्राहकांच्या मुलभूत हक्कांची जाणीव व्हावी, या दृष्टीकोनातून जगभरात१५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ वस्तू खरेदी करताना आपली फसवणूक होवू नये, हा मुख्य हेतू ग्राहकांच्या बाबतीत जोपासला जात असून खरेदीकर्ता व विक्रीकर्ता यांच्यात 'तोल मोल के बोल' झाले पाहिजे, अशीच अपेक्षा ग्राहकांकडून अपेक्षीत आहे.
१५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ . केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्क, कायदा व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या दिवशी अमेरिकन संसदेला एक संबोधन जाहिर केले होते़ त्या दिवसापासून दरवर्षी जगभरात जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो़
वस्तुची प्रत, किंमत, हमी तथा सुरक्षीत तथा याबाबत ग्राहकांना माहिती मिळावी, यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असते़ वर्तमानस्थितीत एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचाकडे धाव घेतो़ ग्राहक तक्रारीमध्ये सर्वात जास्त तक्रारी या विमा संबंधिच्या असतात़ तसेच दुकानात एखाद्या ग्राहकाची फसवणुक झाल्यास वैद्यमापन शास्त्रकार्यालय (वजनमापे) या विभागामार्फत कारवाई केली जाते़
जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षांना प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांचे अधिकार आहेत़ एखाद्या ग्राहकाची फसवणुक झाल्यास तो ग्राहक संरक्षण कायदा सन १९८६ कलम १२ नुसार ग्राहक न्यायालयात प्रकरण सादर करून शकतो़ प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला जास्तीस जास्त तीन वर्षांचा कारावास किंवा कमीत कमी दंडाची कारवाई प्रकरणाच्या स्वरूपानुसार सुनावली जाते़
ग्राहक चळवळ, ग्राहक मंच, वजनमापे, शेतकरी ग्राहक, गॅस ग्राहकाचे हक्क, विज ग्राहकांचे हक्क, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अन्न भेसळ, कृषी विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सेवा आदी संदर्भात ग्राहक मंचात तक्रारी दाखल होत असल्याची माहिती आहे़ (नगर प्रतिनिधी)