शेतकऱ्यांकडे पाणी कराचे १२६ कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:00+5:302021-07-15T04:25:00+5:30
गोंदिया जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ...

शेतकऱ्यांकडे पाणी कराचे १२६ कोटी थकीत
गोंदिया जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत काही शेतकऱ्यांना थेट कालव्याद्वारे पाणी उपलब्ध केले जाते, तर काही शेतकरी कालव्यावर मोटार पंप लावून पाण्याचा उपसा करतात. या प्रकल्पांतर्गत शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. १९७६ ते २००७ पर्यंत बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत ४ हजार ५३२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात आले. त्यात ४ हजार ४८७ शेतकरी कालव्यातून, तर ४५ शेतकरी मोटार पंपाने पाण्याचा उपसा करून शेती सिंचित करीत आहेत. मात्र, गत ३० वर्षांपासून पाणी कराचा भरणा या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला नसल्याची माहिती पुढे आली आहे. २००७ या वर्षापासून या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील काही गावांत पाणी वापर संस्था तयार करण्यात आल्या आहेत. या संस्थाअंतर्गत नियमित पाणी कर वसूल केला जात आहे. मात्र, १९७६ ते २००७ पर्यंतचा पाणी कर थकीत आहे. पाणी कराचा भरणा करण्याचे आवाहन बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत करण्यात येत असले तरी शेतकरी त्याला दाद देत नाहीत.
बॉक्स
लाखांदूर तालुक्यात तीन शाखेंतर्गत सिंचन सुविधा
बाघ इटियाडोह बांध प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तीन शाखेंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. या शाखांमध्ये लाखांदूर, बारव्हा, वडेगाव आदींचा समावेश आहे. या शाखांमध्ये शेतकऱ्यांकडून पाणी कराच्या वसुलीसह अन्य शासकीय कामांसाठी ६३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, तब्बल ५३ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पाणी कर वसुलीत अडचण होत असल्याची माहिती आहे.
140721\161-img-20210714-wa0023.jpg
ईटियाडोह बांधचे संग्रहित छायाचिञ