९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: October 24, 2015 02:54 IST2015-10-24T02:54:38+5:302015-10-24T02:54:38+5:30
जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ ...

९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये १२६ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत़
भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे़ यात भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाख एवढी आहे़ दरवर्षी वाहतूक विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ या सप्ताहादरम्यान दररोज प्रसिद्धी माध्यमातून अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येते. वाहतूक नियमांची ओळख परेड केली जाते.मात्र नागरिकांनी जनजागृतीचा लाभ झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून घेतला नसल्याचे दिसून येते़
यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३२६ अपघाताच्या घटना घडल्या़ यामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला़ या अपघातात ७८ जणांना गंभीर दुखापत तर ११३ जण किरकोळ जखमी झाले़ तसेच २४ अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ असल्याने या महामार्गावर अपघाताची संख्या अधिक आहे.
रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नविन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ तोकडेच आहे. शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी व शिपायांची आकडेवारी बोटावर मोजण्याइतकी आहे. लाखोंच्यावर वाहने आणि नियंत्रण करणारे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे.
परिणामी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. वाहने चालविण्याचा परवाना आरटीओ विभागातून दर दिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्याची मर्यादा आणि दुर्देशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभावदेखील अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. सर्वाधिक अपघात हे ट्रक, टिप्परने धडक दिल्याने झाले आहेत, हे उल्लेखनीय.