१२,५८५ शिधापत्रिका आधार लिंकिंगविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:51 IST2017-10-26T23:51:35+5:302017-10-26T23:51:45+5:30
सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

१२,५८५ शिधापत्रिका आधार लिंकिंगविना
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यात १२ हजार ५८५ शिधापत्रिका अजूनही आधार कार्डाशी संलग्न झालेले नाही.
जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थीसह अन्य योजनेअंतर्गत एकुण शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लक्ष ८० हजार ५८३ इतकी आहे. यापैकी १ लक्ष ६७ हजार ९९८ शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहे. उर्वरीत १२ हजार ५८५ शिधापत्रिका अजूनही आधारकार्डाशी लिंकींग झालेले नाही. विशेष म्हणजे प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत अंत्योदयचे ६३ हजार २८१, बीपीएलचे ७३ हजार ४०१ व केशरी कार्ड धारक अंतर्गत ४३ हजार ९०१ लाभार्थी आहेत.
जिल्ह्यात बीपीएलधारकांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ५५ हजार ९०५ लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ४३ हजार २३६ अर्ज मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ३४ हजार ८७५ लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस जोडणीचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ८ हजार ३६१ लाभार्थी अजूनही उज्ज्वला गॅस जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यात ८९० पॉस मशीन
स्वस्त धान्य वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने पॉस (पॉइंट आॅफ सेल) ही मशीन जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात लावली आहे. यात शिधापत्रिका धारकांच्या उपस्थितीविना धान्य मिळणे दूरापास्त आहे. परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे पॉस या मशीनीमुळे वितरण व्यवस्था पारदर्शक झाली काय? असा सवालही व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात असलेल्या शिधापत्रिका धारकांचे कार्ड आधार कार्डाशी लिंकींग करण्याचे काम सुरु आहे. सदर काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
-रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.