११७ पैकी १११ आंतरजिल्हा बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:22 IST2017-05-04T00:22:39+5:302017-05-04T00:22:39+5:30

जिल्हा परिषद प्रशासनाने ११७ आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. यात अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या होत्या.

117 out of 117 inter-district transfers are canceled | ११७ पैकी १११ आंतरजिल्हा बदल्या रद्द

११७ पैकी १११ आंतरजिल्हा बदल्या रद्द

नवीन सीईओंचे आदेश : अनियमितता अधिकाऱ्यांना भोवणार
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद प्रशासनाने ११७ आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. यात अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या होत्या. यासंदर्भात "लोकमत"ने वृत्तमालिका प्रकाशित केली. दरम्यान मंगळवारला रूजू झालेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी याची दखल घेत ११७ पैकी १११ बदल्या रद्द करण्याचे आदेश काढले आहे.
आंतरजिल्हा बदल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेमध्ये गाजले. याप्रकरणात अनेकांनी आर्थिक व्यवहारातून बदल्या केल्याची व त्यात अनियमितता असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. तीन दिवस या समितीने जिल्हा परिषदेमध्ये ठाण मांडून बदल्या प्रकरणांची फाईल्स तपासल्या. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता. त्या अनुशंगाने ११७ बदल्या बद्दल करण्यात आल्या होत्या. आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत "लोकमत"ने वृत्तमालिका चालविली. दरम्यान या बदल्या प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला "डेप्युटी सीईओंचा खोडा" या आशयाचे वृत्त "लोकमत"ने आज प्रकाशित केले. नव्याने रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी लोकमतचे वृत्त वाचून सकाळी यासंबंधात शिक्षणाधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधीर वाळके यांना विचारणा केली. यात शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुमत आढळून आले. मात्र आयुक्तांच्या पत्रांची दखल घेवून सीईओ सुर्यवंशी यांनी आज बुधवारला ११७ पैकी १११ बदल्या रद्द करण्याचे आदेश काढले. हे आदेश त्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. ११७ पैकी सहा शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या सहा शिक्षकांना वगळून उर्वरित सर्व बदल्या बद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान बदल्यांमध्ये "मध्यस्थी" करणाऱ्यांनी घेतलेले पैसे परत करावे लागणार असल्याने त्यांचे मोबाईल बंद ठेवले आहे. त्यामुळे पैसे देवून बदल्या करणाऱ्या शिक्षकांमध्ये आता आर्थिक लुट झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सीईओंच्या बदल्या रद्द संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

Web Title: 117 out of 117 inter-district transfers are canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.