११३५ घरकुलांना मंजुरी
By Admin | Updated: September 18, 2015 00:39 IST2015-09-18T00:39:58+5:302015-09-18T00:39:58+5:30
तुमसर तालुक्यात वास्तव्य करित असलेल्या अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना सन २०१५-१६ या कालावधी ११३५ घरकुल मिळणार आहेत.

११३५ घरकुलांना मंजुरी
तुमसर तालुक्यातील प्रकार : ओबीसी लाभार्थ्यांना गाजर
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यात वास्तव्य करित असलेल्या अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना सन २०१५-१६ या कालावधी ११३५ घरकुल मिळणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना गाजर दाखविण्यात आले असून. पुरग्रस्त रेंगेपार (पांजरा) येथील नागरिकांना पुन्हा घरकुलांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे गावकऱ्यात असंतोष खदखदत आहे.
केंद्र आणि राज्य शासन अंतर्गत सन २०१५-१६ या कालावधीत प्रवर्ग निहाय घरकुल वाटपाचा कृती आराखडा मंजुर झाला आहे. या संदर्भात तालुका स्तरावर या नियोजनबध्द मंजुरीचे प्रपत्र प्राप्त झाली आहे.तुमसर तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अच्छे दिन दाखविण्यात आले आहे. या प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता ११३५ घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे या प्रवर्गात असणारा घरकुलांचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता १८५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. अल्प संख्याक प्रवर्गाकरिता ८५ घरकुलांना हिरवा कंदील देण्यात आला असला तरी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता फक्त ७५ घरकुल मंजुर झाली आहेत. असे एकुण १४७८ घरकुल मंजुरीचे गाव निहाय यादा तुमसर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाली आहे. ९७ ग्राम पंचायती असणाऱ्या या तालुक्यात ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल वाटप करताना कसरत करावी लागणार आहे. लाभार्थ्यांची यादी लांबच लांब असताना फक्त ७५ घरकुलांचा गाजर प्राप्त झाला आहे. या घरकुलांचे आकड्यात प्रत्येक गावातुन ३ लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. यामुळे हे घरकुल २५ गावातच समाप्त होणार आहे. उर्वरित ७२ गावातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.
तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांचे गृहगाव रेंगेपार (पांजरा) येथे पुराच भिषणता प्रशासन अनुभवत आहे. जलसमाधी, रास्ता रोको, आमरण पोषण तथा शासनाची प्रेतयात्रा या आंदोलनाची चर्चा प्रशासकीय यंत्रणेच्या आजही कानावर आहे. परंतु या गावातील पुरग्रस्तांची घरकुल समस्या सोडविणारी फाईल शासन दरबारी बंद करण्यात आल्या नंतर ओबीसी कोट्यातुन या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधी सुरु केला आहे. या गावात ६३ पुरग्रस्त घरकुल लाभार्थी ओबीसी प्रवर्गातील आहेत. यामुळे शासनाच्या निर्देशानुसार या गावाला ३ घरकुल मिळणार आहे. परिणामत: ६० लाभार्थ्यांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.
ग्राम पंचायतची आयोजित होणारी ग्रामसभा याच प्रश्नावर गाजत आहे. अनेक वर्षापासून घरकुलांचा प्रश्न सुटता सुटेना झाला आहे. बिपीएलच्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येत आहे. गरजू असतानाही यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा फटका बसणाऱ्या अन्य लाभार्थ्यांचा घरकुलासाठी पात्र करण्याचा निर्णय घेत नाही. (वार्ताहर)