संतप्त महिलांचा १० किमी लाँगमार्च
By Admin | Updated: March 21, 2017 00:24 IST2017-03-21T00:24:35+5:302017-03-21T00:24:35+5:30
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर आलेल्या मजुरांना काम बंद असल्याचे कळल्यावर संतप्त झालेल्या महिलांनी वरठी ते मोहाडी असा प्रवास पायी करुन मोहाडी गाठली.

संतप्त महिलांचा १० किमी लाँगमार्च
३०० महिलांचा समावेश : पंचायत समितीवर धडक मोर्चा
तथागत मेश्राम वरठी
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर आलेल्या मजुरांना काम बंद असल्याचे कळल्यावर संतप्त झालेल्या महिलांनी वरठी ते मोहाडी असा प्रवास पायी करुन मोहाडी गाठली. पंचायत समिती समोर जवळपास या ३०० महिलांनी ठिय्या आंदोलन केले. आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून मजुरांच्या समस्या ऐकून घेतल्या. समस्या मार्गी लावणार, अशी हमी दिल्यावर संतप्त महिला मजुर माघारी परतल्या.
वरठी ग्राम पंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास ५०० महिला पुरुष कामावर जातात. वरठी लगतच्या डोकेपार येथे रोहयोचे काम सुरु आहे. नेहमीप्रमाणे आज सर्व मजुर कामावर गेले. कामावर येण्यासाठी उशिर झाल्याचे कारण सांगुन रोजगार सेविका रेखा रोडगे यांनी आज काम बंद ठेवण्याचे सांगितले. यावरुन संतप्त झालेल्या महिलांनी सरळ घटनास्थळाहून थेट मोर्चा मोहाडी पंचायत समितीकडे वळविला. जवळपास ३०० महिला १० किमीचे अंतर पायी चालत पंचायत समितीत दाखल झाल्या.
पंचायत समिती परिसरात महिलांच्या गर्दीने खंड विकास अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पंचायत समितीचे माजी सदस्य रवी येळणे यांनी पुढाकार घेवून महिलांचे गऱ्हाणे ऐकूण घेतले.
आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळावर भेट देवून त्यांचाशी चर्चा केली. यावेळी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे, खंड विकास अधिकारी के.एल. भोरे, वरठीचे ग्राम विकास अधिकारी मामा होवरकर, अभियंता राधेशाम गाढवे आदी उपस्थित होते. महिलांनी आमदार चरण वाघमारे यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. रोजगार सेविका आणि पर्यवेक्षक यांच्यावर कारवाईची मागणी केली. गावातील रोजगार हमी योजनेच्या कामावर ५० दिवसांच्यावर कामावर हजर राहणाऱ्या मजुरांना जॉबकार्ड मिळाले नसल्याची तक्रार मजुरांनी केली.
किमान मजुरी देण्याची मागणी
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर येणाऱ्या मजुरांना कामानुसार रोजी मिळते. मजुरांद्वारे केले कामाचे मोजमाप झाल्यानंतर शासनाने ठरवुन दिलेल्या नियमानुसार मजुरी देण्यात येते. यामुळे मजुरांना किमान वेतनापेक्षा कमी मजुरी मिळते. अनेक मजुरांना दिवसाचे १०० रुपयेही मजुरी हातात येत नाही. राबराब राबुन रोजी मिळत नसल्यामुळे शासनाने किमान वेतननुसार मजुरी देण्याची मागणी केली.
नेतृत्वाविना लाँॅग मार्च
५०० पैकी जवळपास ३०० महिला १० किमीचे अंतर पायी चालत मोहाडी येथे पोहचल्या. सर्वांची मागणी एकच, उद्देश ही एकच. पण बोलणारे अनेक आणि एकच मुद्यावर होणारी ओरड होती. हक्काच्या मागणीकरीता जिवाचे रान करीत भर उन्हात सर्वांनी कार्यालय गाठले. नेतृत्वाविना या मोर्चेकरांची मागणी मुद्देसुद मांडणी करता आली नाही.
पुन्हा पायी परत जाताना...
काम बंद असल्याने संतप्त महिला स्फूर्तीने एकत्र आल्या आणि आवेशात पंचायत समिती कार्यालयात धडकल्या. पण घरुन जेवनाच्या डब्याव्यतिरिक्त काहीच पैसे घेवून न जाणाऱ्या मजुरांना आता परत कसे जायचे असा प्रश्न पडला. आमदार वाघमारे यांनी त्यांच्या समस्याचे समाधान शोधले. मात्र अखेर परत जाताना सर्वजण एकमेकांकडे परत कसे जाणार यासाठी पाहत होते.