१०२चे रुग्णवाहिका चालक मानसिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:42+5:302021-04-07T04:36:42+5:30

भंडारा : शासनाच्या आरोग्य विभागात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना मानसिक विवंचनेत जीवन जगावे लागत ...

102 ambulance driver in mental distress | १०२चे रुग्णवाहिका चालक मानसिक विवंचनेत

१०२चे रुग्णवाहिका चालक मानसिक विवंचनेत

भंडारा : शासनाच्या आरोग्य विभागात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना मानसिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे. २४ तास सेवा देऊनही अशी त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तुटपुंज्या मानधनात संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे. गत दीड दशकांपासून त्यांच्या प्रश्नांना अजूनही वाचा फुटलेली नाही.

गत सव्वा वर्षापासून कोरोना संकटातही १०२च्या रुग्णवाहिका चालकांनी भरीव अशी कामगिरी केली आहे. कोरोना महामारीच्या काळातील अनेक प्रसंगांना तोंड देत इमानेइतबारे आपली सेवा बजावली आहे. आजही ते आपली सेवा अविरतपणे देत आहेत. कोरोना संकट असतानाही या रुग्णवाहिका चालकांना फक्त मानधन मिळत आहे. या व्यतिरिक्त एकही पैसा त्यांना देण्यात आलेला नाही. आरोग्य विभागात असलेल्या डाटा ऑपरेटरलाही अतिरिक्त पैसा मिळाला. मात्र, वाहन चालकांना यामधून का वगळण्यात आले, असा सवालही ते विचारत आहेत.

१०२च्या रुग्णवाहिका चालकांना फक्त गरोदर मातांना घरून उपकेंद्रांमध्ये व उप आरोग्य केंद्रातून प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जिल्हा रुग्णालयात नेण्याचे व आणण्याचे काम दिले जाते. याशिवाय ० ते १ वयोगटातील बालकांना ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशांना भंडारा रुग्णालयात भरती करण्याचे कामही या रुग्णवाहिका चालकांना करावे लागते. याशिवाय कोविड संकट काळात अन्य महत्त्वाची कामे ही केली आहेत, पण त्याचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. शासनाच्या अनेक उपक्रमांमध्ये १०२ वाहन चालकांचा सिंहाचा वाटा असतो. अपघातातील जखमी व्यक्तीला नेणे, याशिवाय नैसर्गिक आपत्ती आलेले पेशंट, याशिवाय प्रस्तुत गरोधर महिलांना ने-आण करण्याची सुविधा रुग्णवाहिका चालक देत असतात. यामध्ये वाहन चालकांना २४ तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. मात्र, त्यांच्याबाबत शासन दरबारी विचार करण्यात आलेला नाही. आरोग्य विभाग व राज्य शासनाने १०२ या रुग्णवाहिका चालकांबाबत योग्य व शासकीय नियमानुसार मदत द्यावी, अशी मागणी या चालकांनी केली आहे.

Web Title: 102 ambulance driver in mental distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.