१०० शाळांमधून मिळणार ‘ई-लर्निंग’
By Admin | Updated: March 26, 2015 00:22 IST2015-03-26T00:22:51+5:302015-03-26T00:22:51+5:30
कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

१०० शाळांमधून मिळणार ‘ई-लर्निंग’
प्रशांत देसाई भंडारा
कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घसरत चालली आहे. जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दैनावस्थेमुळे येथील विद्यार्थी शिक्षणात मागे असल्याने ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. नविन शैक्षणिक सत्रापासून जिल्ह्यातील १०० शाळा ‘ई-स्कूल' प्रणालीने जोडण्यात येणार असून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण मिळणार आहे.
खासगी व कॉन्व्हेंटच्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण व शहरी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी, शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदच्या शाळा ‘ई-प्रणाली’ने जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदने जिल्हा निधीतून ५० लाखांची तरतूद केलेली आहे. हा निधी कमी पडणार असल्यामुळे ‘डावी कडवी योजने’तून जिल्हाधिकाऱ्यांना एक कोटीची मागणी केली आहे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. नविन शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी येत्या काही दिवसातच त्यासंबंधात निविदा काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शंभर जिल्हा परिषदच्या शाळा या प्रणालीशी जोडली जाणार आहे. एका शाळेला एक प्रणाली जोडण्यात येणार असून ‘त्या’ सर्व शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम निर्माण करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे युग असल्याने सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. मात्र, खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक प्रगती वाईट असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतक्या आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याने त्या बंद होण्यासाठी शेवटची घटका मोजत आहेत. अशा स्थितीत कॉन्व्हेंटमधून दिले जाणारे शिक्षण दर्जेदार असल्याने पालकांचा कल त्याकडे वळला आहे.
सध्या कॉन्व्हेंटचे शिक्षण महागडे असले तरी तेथील शिक्षण दर्जेदार असल्याने पाल्यांना खासगी शाळांमधूनच शिक्षण दिल्या जात आहे. भंडारा जिल्ह्यातही ही परिस्थिती वेगळी नाही. येथील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा औटघटकेच्या ठरल्या आहेत. ज्या शाळा आहेत, त्यांचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी शिक्षण विभागाने आता उशिरा का होईना, जाग आल्याने शिक्षणात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.
खासगी कंत्राटदाराकडे जि.प.चा कल
जिल्हा परिषद ई-लर्निंग प्रणाली कार्यान्वित करीत आहे. यासाठी टेंडरींग करून ते खासगी कंत्राटदाराला टेंडर देणार आहे. त्यापेक्षा जिल्हा परिषदेने ही प्रणाली बालभारतीकडून घेऊन ती शाळांमध्ये लावल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बालभारती ही विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीची मुख्य भुमिका पार पाडते. बालभारतीकडून दर्जेदार प्रणाली उपलब्ध होते. परंतु, बालभारतीकडून पदाधिकाऱ्यांवर मेहेरबानी होत नसल्यामुळे हे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे.
ई-लर्निंग प्रणालीमुळे जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शिक्षणाप्रती आकर्षण निर्माण होईल. नविन शैक्षणिक सत्रापासून ही प्रणाली सुरू करण्यात येत आहे.
-रमेश पारधी
शिक्षण सभापती, जि.प. भंडारा.