१० पैकी एकाला होतो मधुमेहाचा आजार
By Admin | Updated: November 13, 2014 22:57 IST2014-11-13T22:57:26+5:302014-11-13T22:57:26+5:30
जागतिक मधुमेह संस्था यांच्या आकडेवारीनुसार जगामध्ये ३८२ दशलक्ष लोक हे मधुमेहामुळे पिडीत आहेत. २०३५ पर्यंत ५९२ दशलक्ष लोक किंवा दहा व्यक्तीमागे एक लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे.

१० पैकी एकाला होतो मधुमेहाचा आजार
भंडारा : जागतिक मधुमेह संस्था यांच्या आकडेवारीनुसार जगामध्ये ३८२ दशलक्ष लोक हे मधुमेहामुळे पिडीत आहेत. २०३५ पर्यंत ५९२ दशलक्ष लोक किंवा दहा व्यक्तीमागे एक लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ३१६ दशलक्ष लोक हे प्रकार २ मधुमेहापासून पीडीत होण्याच्या मार्गावर आहेत व एकुण ५०० दशलक्ष लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. प्रकार २ मधुमेह टाळता येऊ शकतो, योग्य व सकस आहार घेतल्यास आजार आटोक्यात ठेवता येतो.
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१४-१६ या कालावधीत मधुमेह व आरोग्यदायी जीवन यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यावर्षी आरोग्यदायी आहार, मधुमेह व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांचा प्रतिबंध यावर भर देण्यात आला आहे. जेणे करून मधुमेहामुळे होणारे नुकसान टाळता येईल. वाढलेल्या आयुर्मानासोबत मधुमेह रुग्णांच्या समस्या वाढत आहेत. या अनुषंगाने शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु केलेला आहो. त्या अंतर्गत रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, मोतीबिंदू यांचे निदान व उपचार केले जातात. या आजाराविषयी असलेल्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिली जाते.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त दि. १४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता रॅलीचे आयोजन केलेले आहे. सदर रॅलीचे उद्घाटन डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सामान्य रुग्णालय, भंडारा येथे शाहीर ब्रम्हानंद हुमणे बहुउद्देशिय कला पथक, धामणी, जिल्हा भंडारा यांचे जागतिक मधुमेह दिवस संबंधित जनजागृती व कलापथक व चलचित्राद्वारे मधुमेहाविषयी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन व माहिती दाखविण्यात येतील.जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह रुग्णांची तपासणी व त्यामुळे होणारे धोके यावर मार्गदर्शन व उपचार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून केले जातील तसेच सूरज नेत्र चिकित्सा नागपूर यांच्या वतीने रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दि. १४ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेले आहे. मधुमेह रुग्णांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)