तलाव दुरुस्तीला १० लाख मंजूर
By Admin | Updated: May 21, 2017 00:22 IST2017-05-21T00:22:40+5:302017-05-21T00:22:40+5:30
आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती.

तलाव दुरुस्तीला १० लाख मंजूर
चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून निधी
वरठी : आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती. तलावाची पाळ दुरुस्त न झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीचा प्रश्न लावून धरला होता. आमदार चरण वाघमारे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन जिल्हा परिषद भंडारा यांना आकस्मिक निधीतून तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना दिली. अखेर तलाव दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरु होणार आहे.
आठ महिन्यापूर्वी वरठी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी वाहून गेले. यात शेकडो एकर शेतातील धानपिक नष्ट झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आठ महिन्यापासून तलावाच्या दुरुस्तीसाठी मागणी होत असतानाहीअधिकारी दुर्क्षक्ष करीत होते. सदर तलाव जिल्हा परिषद भंडारा च्या लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भंडारा तलावाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. पण आठ महिन्यापासून काम पूर्ण करण्याकरिता निधी नसल्याची ओरड सुरु होती.
पावसाळा जवळ असून काम सुरु न झाल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी अखेर तलाव दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन सदर बाब आमदार चरण वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. याबाबत आमदार वाघमारे यांनी सदर बाब जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या लक्षात आणून देऊन प्रकरणाचे गांभीर्य सांगितले.
तलाव दुरुस्त न झाल्यास शेकडो एकर शेतीपिक घेण्यासाठी वंचित राहिली असतील. याबाबद ग्रामपंचायत वरठी येथे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर पराते यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली होती. यावेळी सरपंच संजय मिरासेल जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके, मोहगावचे सरपंच राजेश लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोरकर, थारनोद डाकरे, शेतकरी वामन थोटे, राजू भाजीपाले, रामू चकोले, झिंगर मरघडे, शिवा गायधने, सुरेंद्र भाजीपाले व दामोधर गायधने यांच्यासह ४२ शेतकरी उपस्थित होते.
तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून दहा लक्ष रुपये मंज़ूर झाले असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. सदर काम लवकरात लवकर सुरु करणे आवाहन असून याबाबत संपूर्ण लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.