निवडणूक रिंगणातील १० उमेदवार कोट्यधीश

By Admin | Updated: September 29, 2014 22:59 IST2014-09-29T22:59:53+5:302014-09-29T22:59:53+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांपैकी १० उमेदवार कोट्यधीश आहेत. धनशक्ती व जातीय समीकरणाच्या आधारे लढविली

10 crore candidates in the election contest | निवडणूक रिंगणातील १० उमेदवार कोट्यधीश

निवडणूक रिंगणातील १० उमेदवार कोट्यधीश

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांपैकी १० उमेदवार कोट्यधीश आहेत. धनशक्ती व जातीय समीकरणाच्या आधारे लढविली जाणारी ही निवडणूक अन्य कोणत्याही जनसामान्याच्या ऐपतीची नाही, असेच अखेर स्पष्ट होते. उमेदवारांपैकी काहींकडे हजारोंची तर काही उमेदवार लक्षाधीशही आहेत.
तुमसर विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले मधूकर कुकडे, अनिल बावनकर, राजेंद्र पटले, चरण वाघमारे हे कोट्यधीश उमेदवार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले देवांगणा गाढवे, नरेंद्र भोंडेकर, युवराज वासनिक, सच्चिदानंद फुलेकर आणि साकोली विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले सेवक वाघाये, सुनिल फुंडे, बाळा काशिवार हे कोट्यधीश उमेदवार आहेत.
नरेंद्र भोंंडेकर यांचे २०१३-१४ मध्ये आयकरात दर्शविल्याप्रमाणे वार्षिक उत्पन्न हे २० लक्ष तीन हजार १८८ रूपये आहे. त्यांची व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली अस्थाई मालमत्ता ही ७४ लक्ष ५७ हजार ३४० इतकी आहे. भोंडेकर यांच्याकडे १४ लक्ष ८२ हजार १८९ रूपयांची रोख रक्कम आहे. भोंडेकर यांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता ही ५० लक्ष ६४ हजार रूपये तर पत्नीच्या नावे एक कोटी २५ लक्ष ७० हजार रूपयांची मालमत्ता आहे. भोंडेकर व त्यांच्या पत्नीच्या नावे प्रत्येकी १० लक्ष रूपयांचे वाहन कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ८० लाखांचे गृह व घरतारण कर्ज असल्याची नोंद आहे.
सुनिल फुंडे यांची अस्थाई मालमत्ता ही ५२ लक्ष ३५ हजार ८९६ रूपये इतकी आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे २० लक्ष ४९ हजार ९८३ रूपये तर दोन्ही मुलींच्या नावे चार लक्ष ७० हजार रूपयांची अस्थाई मालमत्ता आहे. फुंडे यांच्याकडे स्थावर मालमत्ता एकूण ६० लक्ष ६९ हजार ८२६ रूपयांची आहे. फुंडे यांच्यावर सात लक्ष ७६ हजार ४०७ रूपयांचे क्रॉफ्ट लोन असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
सेवक वाघाये यांचे सन २०१३-१४ चे वार्षिक उत्पन्न २२ लक्ष ९५ हजार इतकी आहे. यात त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या उत्पन्नाचाही समावेश आहे. सेवक वाघाये व त्यांच्या पत्नीची एकूण स्थावर मालमत्ता ही ६५ लक्ष १७ हजार ३६१ रूपयांची आहे. वाघाये यांची एकूण स्थायी मालमत्ता ही तीन कोटी ६० लक्ष ३३ हजार १५० रूपयांची आहे. सेवक वाघाये यांच्याकडे पंजाब नॅशनल बँकेचे ३५ लक्ष रूपयांचे कर्ज आहे. तसेच निर्मल बँकेचे २५ लक्ष तर महाराष्ट्र को आॅपरेटिव्ह बँकेचे ३० लक्ष रूपयांचे कर्ज आहे.
अनिल बावनकर यांच्याकडे १५ लाखांची रोकड असून त्यांचे सन २०१२-१३ मध्ये एकूण वार्षिक उत्पन्न सात लक्ष ३८ हजार ११९ इतकी आहे. त्यांचे पत्नीचे वार्षिक उत्पन्न चार लक्ष दोन हजार ७८८ तर मुलाच्या नावे वार्षिक उत्पन्न म्हणून दोन लक्ष ४५ हजार २५८ रूपयांची नोंद आहे. अनिल बावनकर यांच्याकडे एक चारचाकी व पत्नी व मुलाच्या नावे प्रत्येकी एक दुचाकी आहे. अनिल बावनकर यांच्या नावे स्थावर मालमत्ता ही ५९ लक्ष १९ हजार ६६२ तर त्यांची पत्नी अनिता यांच्या नावे २७ नक्ष ७० हजार १६६ रूपये तर मुलाच्या नावे ८६ हजार ३८३ इतकी आहे. बावनकर कुटूंबियाकडे स्थायी मालमत्ता ही एकूण चार कोटी १८ लक्ष २९ हजार इतकी आहे.
देवांगणा गाढवे यांच्याकडे ३५ हजार रूपयांची रोख तर त्यांचे पती विजय गाढवे यांच्या नावे ३० हजार रूपयांची रोकड आहे. गाढवे दांपत्याकडे अस्थाई मालमत्ता ही एक कोटी नऊ लक्ष ४३ हजार ४७७ इतकी आहे. गाढवे यांची स्थावर मालमत्ता ही विजय गाढवे यांच्या नावे असून ती एक कोटी सहा लक्ष ९६ हजार ६३० रूपयांची आहे. देवांगणा गाढवे यांच्यावर कर्ज नाही. मात्र त्यांच्या पतीच्या नावे १६ लक्ष १९ हजार ६४६ रूपयांचे वाहन कर्ज, २१ हजार २२६ रूपयांचे वाहन कर्ज, वैयक्तीक कर्ज म्हणून तीन लक्ष ८८ हजार ३३१ रूपये तर क्राप लोन म्हणून एक लक्ष ३१ हजार ४८१ रूपयांचे कर्ज आहे.
मधुकर कुकडे यांचे सन २०१४-१५ चे वार्षिक उत्पन्न चार लक्ष ३० हजार ९५० इतके आहे. मधुकर कुकडे यांच्याकडे ५० हजाराची तर त्यांची पत्नी उषा कुकडे यांच्या नावे पाच लाखांची रोख रक्कम आहे. मधुकर कुकडे यांची स्थावर मालमत्ता १२ लक्ष ७३ हजार ९५० रूपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता ही ३१ लक्ष ८० हजार ३९९ आहे. कुकडे यांची स्थायी मालमत्ता बाजारभावानुसार ४५ लाख तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता ही ७० लक्ष रूपयांची आहे.
चरण वाघमारे यांचे सन २०१३-१४ चे वार्षिक उत्पन्न हे पाच लक्ष आठ हजार ३६० रूपये एवढे आहे. वाघमारे यांची स्थावर मालमत्ता ही एकूण २७ लक्ष ३० हजार ३०६ रूपये तर त्यांच्या पत्नी विजयश्री यांच्या नावाने ३० लक्ष ८१ हजार ५८० रूपयांची संपत्ती आहे. स्थावर मालमत्तामध्ये चरण वाघमारे यांच्या नावे एकूण २८ लक्ष १० हजार ४०० रूपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे पाच लक्ष २५ हजार रूपयांची मालमत्ता आहे. चरण वाघमारे यांच्यावर सात लक्ष रूपयांचे तर त्यांच्या पत्नीवर तीन लक्ष रूपयांचे लोन आहे.
प्रमोद तितीरमारे यांचे सन २०१३-१४ मध्ये एकूण वार्षिक उत्पन्न आठ लक्ष १० हजार ८९३ रूपयांची आहे. तितिरमारे यांच्या नावे चार लक्ष ९० हजार तर पत्नीच्या नावे एक लक्ष २० हजार रूपयांची रोकड आहे. त्यांची एकूण अस्थाई मालमत्ता ही ११ लक्ष ४३ हजार ९२५ तर त्यांच्या पत्नीच्या नावे ११ लक्ष ३२ हजार १५८ रूपये इतकी आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ही सात लक्ष १३ हजार रूपयांची आहे. बाजार मुल्याप्रमाणे स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ४२ लक्ष रूपये इतकी आहे. त्यांच्या व त्यांच्या पत्नीवर प्रत्येकी दोन लक्ष १८ हजार रूपयांचे कर्ज आहे.
बाळा (राजेश) काशिवार यांचे सन २०१३-१४ चे एकूण उत्पन्न १० लक्ष ७४ हजार ३३० रूपये इतकी आहे. काशिवार यांच्याकडे एक लक्ष रूपये तर त्यांची पत्नी अनुराधा यांच्याकडे २५ हजार रूपयांची रोकड आहे. त्यांची अस्थायी मालमत्ता ही एकूण ५७ लक्ष २१ हजार ४५७ रूपयांची आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ही ५३ लक्ष ११ हजार रूपयांची आहे.
प्रशांत पडोळे यांचे सन २०१४-१५ चे एकूण वार्षिक उत्पन्न ४८ हजार ६३२ रूपये इतकी आहे. प्रशांत पडोळे यांची जंगम मालमत्ता तीन लक्ष रूपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे सात लक्ष २० हजार रूपयांची संपत्ती आहे. त्यांची स्थावर मालमत्ता एकूण सात लक्ष ५० हजार रूपयांची असून अदमासे चालू बाजार किंमत ३२ लक्ष रूपये इतकी आहे.
युवराज वासनिक यांचे सन २०१३-१४ चे वार्षिक उत्पन्न २४ हजार १३० रूपये असून त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न तीन लक्ष ३० हजार ८० रूपये आहे. वासनिक यांच्या नावे तीन लक्ष तर त्यांच्या पत्नीच्या नावे पाच लक्ष रूपयांची रोकड आहे. वासनिक यांची जंगम मालमत्ता १२ लक्ष १०२ रूपयांची असून त्यांचे पत्नीची एकूण मालमत्ता नऊ लक्ष ४८ हजार ९२ रूपयांची आहे. युवराज वासनिक यांची स्थावर मामलत्ता ९२ लक्ष सात हजार रूपयांची आहे. यात वारसाप्राप्त मालमत्ता एकूण ८९ लक्ष सात हजार रूपये आहे. रामचंद्र अवसरे यांच्याकडे एक लक्ष २० हजार रूपयांची रोख रक्कम आहे. त्यांची स्थावर जंगम मालमत्ता ही एकूण सहा लक्ष २३ हजार ३५८ रूपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे पाच लक्ष २८ हजार रूपयांची संपत्ती आहे. अवसरे यांची स्थावर मालमत्ता सात लक्ष तर पत्नीच्या नावे पाच लक्ष रूपयांची संपत्ती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 10 crore candidates in the election contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.