हो! कलियुगातही चमत्कार घडतात, फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:47 PM2021-07-21T13:47:34+5:302021-07-21T13:47:52+5:30

चमत्कार घडावा असे प्रत्येकाला वाटते पण असा चमत्कार आपणही घडवू शकतो याबद्दल कोणाला कल्पना नसते!

Yes! Miracles also happen in Kali Yuga, only its appearance is different! | हो! कलियुगातही चमत्कार घडतात, फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते!

हो! कलियुगातही चमत्कार घडतात, फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते!

Next

चमत्कार ही काही जादू नाही, तर चमत्कार म्हणजे योगायोग, जो कोणाच्याही बाबतीत, कधीही अनपेक्षितपणे घडू शकतो. फक्त त्यावर विसंबून न राहता आपण आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून चिकाटीने काम केले पाहिजे. आता ही गोष्टच पहा ना...

एक छोटेसे त्रिकोणी कुटुंब असते. आई वडील आणि छोटा मुलगा. हे कुटुंब लवकरच चौकोनी होणार अशी गोड बातमी कळते. आई बाबा मुलाला सांगतात, 'तुझ्याशी खेळायला आता छोटेसे बाळ येणार आहे.' मुलगा आनंदून जातो आणि म्हणतो, `माझ्यासाठी एक बहीण आणा, मी तिला छान सांभाळीन!'

काही काळातच मुलाची इच्छा पूर्ण होते आणि त्यांच्या घरात छोटीशी परी येते. पण कुटुंब त्रिकोणीच राहते. कारण बाळ जन्मताच आईला देवाज्ञा होत़े छोटा मुलगा बहिण मिळाल्याच्या आनंदात असतो. बाबा हिंमत करून मुलाला आईची बातमी सांगतात. मुलगा आईला दिलेल्या शब्दानुसार बहिणीची काळजी घेतो. परंतु काही दिवसात बहीण अचानक आजारी पडते. बाबा तिला दवाखान्यात नेतात, तर डॉक्टर सांगतात, तिच्यावर उपचार करावे लागणार आहेत, तिला मोठा आजार झालेला असण्याची शक्यता आहे. उपचारासाठी खूप खर्च येईल.'

हतबल झालेले बाबा बहिणीला घेऊन घरी येतात. औषध देतात आणि कोपऱ्यात बसून खूप रडतात. मुलगा विचारतो, `बाबा काय झाले आहे छकुलीला?' ते सांगतात, `छकुलीला आजार झाला आहे आता तिला चमत्काराचे औषध मिळाले तरच ती बरी होईल नाहीतर ती आईसारखी...'

मुलगा धावत आपल्या खोलीत जातो. संचयनीचा डबा उघडतो, त्यात जमलेले शंभर रुपये घेतो आणि धावत मेडिकल वाल्याकडे जातो. तिथे जाऊन सांगतो, 'काका, हे पैसे घ्या आणि मला चमत्काराचे औषध द्या!' 

मेडिकलवाला त्याची समजूत काढतो, असे कोणते औषध नसते असेही सांगतो. परंतु मुलगा हट्ट सोडत नाही. तेव्हा तिथे उभा असलेला एक माणूस मुलाला ते औषध कोणासाठी हवे आहे विचारतो. मुलगा सगळी हकीकत सांगतो. तो माणूस त्याला बहिणीची भेट घालून दे असे सांगतो. त्या माणसाला घेऊन मुलगा घरी येता़े  बाबांची आणि त्या माणसाची भेट घालून देतो. तो माणूस बहीणीला तपासतो आणि सांगतो घाबरण्याचे काही कारण नाही, वेगळ्या उपचार पद्धतीने तुमची मुलगी ठणठणीत बरी होईल, तिला उद्या या पत्यावर घेऊन या. बाबा त्या माणसाची ओळख विचारतात. तो माणूस प्रख्यात बालरोगतज्ज्ञ असल्याचे सांगतो.

त्यांचे नाव ऐकून बाबांचा कानावर विश्वासच बसत नाही कारण त्यांच्या मुलीचे उपचार केवळ तेच डॉक्टर करू शकतील असे त्यांना सांगण्यात आले असते. आणि ती व्यक्ती आपणहून चालत घरी येते हे पाहून बाबा डॉक्टरांचे पाय धरतात आणि त्यांच्या उपचारांचा खर्च विचारतात. त्यावर डॉक्टर म्हणतात, माझी फी मला मगाशीच मिळाली...शंभर रुपये!'

असे चमत्कार आजच्या काळातही घडतात. हा चमत्कार आहे माणुसकीचा. तो आजही अनेक चांगल्या लोकांनी जपला आहे. आपणही माणुसकीला जागून असा चमत्कार घडवुया आणि शक्य तेवढी दुसऱ्यांना मदत करून त्यांचा माणुसकीवरील चमत्काराचा विश्वास वाढवूया!

Web Title: Yes! Miracles also happen in Kali Yuga, only its appearance is different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.