शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी' असे का म्हणतात? वैभवलक्ष्मी व्रताच्या निमित्ताने जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 08:00 IST

मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठव करून दिला आहे.

दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. म्हणून पाश्चात्य संस्कृतीत 'गुड मॉर्निंग' म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचेच अनुकरण म्हणून आपल्याकडेही 'राम राम' ऐवजी 'सुप्रभात' म्हटले जाते. मात्र, दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. तो विचार आपल्या विस्मृतीत जाऊ नये, म्हणून ही उजळणी. शिवाय आजपासून मार्गशीर्ष गुरुवारचे वैभवलक्ष्मी व्रत देखील सुरू होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पूजेला या माहितीचीही जोड हवीच!

पाच इंचाचा मोबाईल हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडला. आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वत:चे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करून घेऊ लागला. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाइलरूपी जग हातात घेण्याआधी हा श्लोक म्हणा, मग जगाला सामोरे जा. 

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे. 

उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला, तर आपल्या लक्षात येईल, की लक्ष्मी, विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे, ही मानवाच्या हातातली, म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरूरी आहे. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे. 

मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठव करून दिला आहे. 'तूज आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी।' आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे. सगळा पुरुषार्थ आपल्या हातांमध्ये आहे. हाच हात कोणावर उगारला, तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो, मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला, तर पुरुषार्थ वाढतो. 

एखादा रिकामा मनुष्य 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' अशी अपेक्षा करत असेल, तर तो आयुष्यभर रिकामाच राहील. त्याला कोणीही किंमत देणार नाही. भगवंत तरी आणखी काय काय देणार? दोन हात, दोन पाय, ज्ञानेंद्रिय, कमेंद्रिय, बुद्धी, मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य रडत राहतो. भगवंताने मला काय दिले? हिच जाणीव होण्यासाठी `प्रभाते करदर्शनम्'

'उद्योगाचे घरी, लक्ष्मी पाणी भरी' असे म्हटले जाते. एका जागी बसून, दुसऱ्यांच्या सुखाशी, यशाशी तुलना करून आपल्याला यश मिळत नाही. मिळते ती फक्त निराशा. ईशकृपेने सिद्धी अवश्य मिळते. परंतु, त्यासाठी प्रयत्नांची शर्थ मनुष्यालाच करावी लागते. 

लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली, की व्यक्ती रसातळाला जाते. हीच बाब `गृहलक्ष्मी'च्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही, त्या घरात  शांतता, सुख, समृद्धी नांदत नाही. 

हातात प्रचंड शक्ती आहे. `हिम्मते मर्दा तो मददे खुदा' असे म्हणतात. संकटाशी `दोन हात' करायचे, की पळ काढायचा, हे मनुष्याच्या `हाती' आहे. ही जाणीव होण्यासाठी, `प्रभाते करदर्शनम्' 

देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि चैतन्यमूर्ती गोविंद सर्वांना प्रसन्न होवो, म्हणून या क्षणापासून म्हणा, 'कराग्रे वसते लक्ष्मी....!'