शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भारद्वाज पक्ष्याचे दिसणे का समजला जातो शुभ शकुन? कृष्णकथेत आहे उत्तर; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 06:30 IST

सद्यस्थितीत झपाट्याने होत असलेली वृक्ष तोड पाहता कावळा चिमणीचेही दर्शन दुर्मिळ झाले आहे, अशात भारद्वाजाचे दर्शन घडले तर? 

>> सिद्धार्थ अकोलकर

अहमदनगरच्या एका डॉक्टरांना नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकाजवळ दहा बारा भारद्वाजांचा थवा दिसला असं वाचनात आलं. हा खरंतर एक महादुर्मीळ प्रसंग आहे कारण भारद्वाज हा अगदीच एकटा-दुकटा राहणारा पक्षी आहे. थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अलींनाही फार क्वचित भारद्वाजांचा थवा आढळलेला आहे. डॉक्टर साहेबांच्या त्या लेखामुळे एकूणच 'माझ्या भारद्वाजा'ला वेळ मिळाला असं म्हटलं पाहिजे. या पक्ष्याचं संपूर्ण शरीर रखरखीत झळाळत्या काळ्या निळ्या जांभळ्या रंगाचं असून त्यावर लाल मातकट विटकरी रंगाचे पंख असतात. भारद्वाज त्याच्या लांबसडक पंख आणि शेपटीमुळे नजरेत भरतो... पण जर सहज दिसला तर! आणि एकदा जर तो दिसला तर त्याच्या त्या गुंजेसारख्या लालभडक डोळ्यांमुळे तो कायमचा लक्षात राहतो.

भारद्वाज हा खरा कोकीळेच्या कुळातला एकटा-दुकटा वा जोडीने राहणारा पक्षी पण पिल्लांच्या पालकत्वाच्या बाबतीत मात्र त्याच्या जातभाईंसारखं वागत नाही. एकदा त्यांची जोडी जुळली की निदान काही हंगामांपुरती तरी ती टिकून असते. विणीच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) खूप साऱ्या खाद्यभेटी देऊन मादीचं मन वळवलं की नरपक्षी घरटं बांधायच्या वा जुन्या घरट्याच्या डागडुजीला लागतो. जमिनीपासून साधारण पंधरा फुटांवर झाडाच्या बेचक्यात किंवा एखाद्या वळचणीला छान गोल घुमटाकार खोपा बांधलेला असतो. यथायोग्य वेळी ती त्यात तीन ते पाच अंडी घालते. पिल्लांचा सांभाळ ती आणि तो मिळून करतात. या राजसपक्ष्याने कोकणातल्या सावंतवाडीचं 'सिटी बर्ड' पद मिळवलेलं आहे आणि दुर्दैवाने जर कधी 'तमिळ ईलम' निर्माण झालंच तर ते भारद्वाजाचा त्यांचा ‘राष्ट्रीय पक्षी’ म्हणून सन्मान करणार आहेत.

गेली बरीच वर्षं आमच्या घराजवळ भारद्वाजाच्या दोन जोड्या राहात आहेत. शेतातल्या पाण्याच्या पंपासारखी त्यांची ती 'कुक्‌-कुक्‌' 'कुक्‌-कुक्‌' करत येणारी साद कानावर पडताक्षणी आम्ही खिडक्यांजवळ, गच्चीवर पळत सुटायचो. कारण आजी सांगायची, "सकाळी हा पक्षी दिसणं म्हणजे शुभशकून"! आज आमचा मुलगाही तस्साच पळत सुटतो आणि मग त्याच्या आजीलाही पळवतो. लक्ष देऊन ऐकलं तर त्या आवाजातली विविधता सहज कळून येते. तो वर उल्लेखलेला आवाज हा एकमेकांचं लक्ष वेधण्यासाठी असतो. 'हिस्स' सारखा आवाज धोक्याची निशाणी असते. कर्णकर्कश्श अशा 'स्किऽऽॲऑ' आवाजाने रागे भरले जातात. काही वेळेला ते 'लोटॉक्क, लोटॉक' असा खुळखुळा वाजवल्यासारखा भरभर आवाजही काढतात. मादी दिसायला नरापेक्षा किंचित मोठी असते पण तिच्या आवाजाची पट्टी मात्र त्याच्या आवाजाच्या एक घर खालची असते.

आपल्याला कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांची गोष्ट माहितीय. तर या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे. कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगायला नकोच. सुदाम्याच्या त्या मळक्या पिशवीमधले मूठभर पोहे कृष्ण खातो काय आणि इकडे सुदाम्याचं घर संपत्तीने भरुन जातं काय! असो. सांगायचा मुद्दा म्हणजे अगदी पार त्या काळापासून सकाळी भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं गेलंय. आम्हाला भारद्वाज रोजच दिसतो; बस्स, कृष्ण भेटायचा तेवढा बाकी आहे.

माणूस हा एक अत्यंत विक्षिप्त प्राणी आहे. एका बाजूला ‘शुभ शुभ’ म्हणून भारद्वाजाला डोक्यावर घेणाऱ्या माणसाने या पक्ष्याला वाईट दिवसही पाहायला लावले होते. कोणे एके काळी प्राचीन भारतात भारद्वाजाचं मांस खाणं हा अनेक रोगांवरचा 'अक्सीर इलाज' म्हणून सांगितलं जायचं. खास करुन क्षयरोग आणि फुफ्फुसांच्या विकारावर ते अतिशय गुणकारी असतं असा समज होता. भारतात नवीनच आलेल्या ब्रिटीश शिपायांनी तर अनेकदा तित्तर पक्षी समजून भारद्वाज मारले पण त्याचं विचित्र वासाचं व चवीचं मांस त्यांना पचवता आलं नाही. त्यामुळे त्यांनी भारद्वाजाला 'दुःखी तित्तर' असं अजब नाव बहाल केलेलं होतं. इंग्रजांच्या काळात भारद्वाजाची बेसुमार हत्या झाल्याची नोंद आहे. 

भारद्वाज दिसणं शुभ का मानायचं तर तो छोटेमोठे किडे, अळ्या, सापसुरळ्या, छोटे बेडूक, सरडे, पाली, इ. मोठ्या आवडीने खातो. इतर पक्ष्यांची अंडी पळवून खाण्यातही चांगलाच तरबेज असतो. क्वचित कधी मोठे साप पकडून खातानाही तो दिसलेला आहे. त्याच्या दोन इंची नख्या सरळधोप आणि अत्यंत तीक्ष्ण असतात. अवतीभवती भारद्वाज दिसला की आपण निर्धोक व्हावं. सापाचं, विंचूकाट्याचं भय त्याच्या हद्दीत तरी नक्कीच नसतं. सरपटणारा तमाम प्राणीवर्ग त्याला जाम घाबरतो.

भारद्वाज पाळायचे प्रयत्न मात्र कधी करु नयेत. त्याच्या रक्ताच्या तांबड्या पेशीत हिमोस्पोरीडीया हा हिंवताप (Malaria) पसरवणारा परजीवी आढळतो. हा पक्षी जास्त काळ जमिनीवर राहात असल्याने त्याच्या अंगावर गोचीडी, पिसवा असे रक्तपिपासू कीटकही असतात आणि त्यांच्यामार्फत हिंवताप माणसामध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यापेक्षा तो असा बागडणारा, मोकळाच राहिलेला बरा; तरच तो ‘शुभशकुन’ खऱ्या अर्थाने सुफल फलदायी होईल.