धर्मशास्त्राने तीर्थयात्रेचा आग्रह का धरला आहे? त्यातून काय साध्य होते व काय लाभ होतात ? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:12 PM2021-10-21T12:12:25+5:302021-10-21T12:12:54+5:30

यात्रेचा अर्थ मनोरंजन, पर्यटनापेक्षाही जास्त परमार्थाचा बोध आणि परमार्थाची ओढ निर्माण होणे असा आहे. वैयक्तिक यात्रा परमार्थाची अनुभूती देणारी ठरते.

Why does Dharmashastra insist on pilgrimage? What is achieved and what are the benefits? Read on! | धर्मशास्त्राने तीर्थयात्रेचा आग्रह का धरला आहे? त्यातून काय साध्य होते व काय लाभ होतात ? वाचा!

धर्मशास्त्राने तीर्थयात्रेचा आग्रह का धरला आहे? त्यातून काय साध्य होते व काय लाभ होतात ? वाचा!

Next

पूर्वी वानप्रस्थाला लागलेले लोक प्रपंचातूनही सेवानिवृत्ती म्हणून यात्रेसाठी पायी जात असत. मात्र दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे तसेच धार्मिक स्थळांना पर्यटन क्षेत्राचे स्वरूप आल्यामुळे आबालवृद्धांचा तीर्थक्षेत्री जाण्याकडे कल वाढला आहे. हा बदल स्वागतार्ह आहे, परंतु धर्मशास्त्राला यात्रा अपेक्षित आहे, सहल नाही! यातील भेद जाणून घेऊ.

तीर्थयात्रा परमार्थमार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, हेही विसरून चालणार नाही. कारण दह्यातील लोणी स्थिरावून एकवटण्यासाठी जसे दही घुसळावे लागते त्याप्रमाणे मनाला घुसळल्याखेरीज ते स्थिर होत नाही. दिवसभर हुंदणारी वासरे सायंकाळी गोठ्यात जातात व निमूटपणे राहतात त्याप्रमाणे तीर्थयात्रेमध्ये नानात्वाचे दर्शन झाल्यावर एकत्त्वाचा ध्यास लागलेले चित्त स्थिर एका जागी बसून उपासनेचा ध्यास घेते. 

यात्रेचा प्रभाव 

समाजातील साधकवर्गाचे थोडे निरीक्षण केल्यास सहजपणे दिसून येईल की, अनेक वेळा तीर्थयात्रा करून आलेले व परमार्थाची तळमळ असलेले साधक वृत्तीने जास्त गंभीर व विकारांच्या कमी आहारी गेलेले असतात. कारण यात्रा करताना त्यांना आलेल्या अनुभवामुळे त्यांचा अहं बराच चेपला गेलेला असतो व सहनशक्ती वाढलेली असते. यात्रेतील गोंगाटामुळे त्यांची एकांताकडे ओढ असते. बाहेरचे विशाल जग, भिन्न भाषा, भिन्न प्रांत, भिन्न आचार यामुळे त्यांचा संकुचितपणा नष्ट झालेला असतो व हेकेखोरपाही कमी झालेला असतो. याउलट बाहेरच्या जगाचे थोडेदेखील दर्शन झालेले साधक वृत्तीने काहीसा हेकेखोर, तामसी व विकारवश असतात. 

यात्रेचे स्वरूप 

यात्रेचे अनेक प्रकार असून शारीरिक व आर्थिक क्षमतेनुसार यात्रा कराव्यात. किमान त्रिस्थळी - प्रयाग, वाराणशी, गय व रामेश्वर यात्रा झाली तरी पुष्कळ आहे. अशी पूर्वीची समजूत होती.  कारण यात्रा करताना पायी चालणे क्रमप्राप्त असे. पण हल्ली वाहनांची व प्रवासाची सुलभता असल्यामुळे विविध यात्रा करणे शक्य झालेले आहे. तरीदेखील काही सक्षम साधक विविध नद्यांच्या प्रदक्षिणा पायी करताना दिसतात. विशेषत: नर्मदा प्रदक्षिणा अत्यंत दुष्कर असल्यामुळे ती केल्यावर कृतकृत्यता झाली अशी अद्यापही समजूत आहे. 

यात्रेचे प्रकार 

यानंतर चारोधाम यात्रेचे महत्त्व आहे. हे चार धाम भारतवर्षाच्या चार विरुद्ध दिशेला आहेत. बद्रिकेदार, वाराणशी, पुरी व रामेश्वर हे चार धाम आहेत. 
याखेरीज वाराणशी, प्रयाग, गया, बद्रिकेदार, पुष्कर, सिद्धपूर, वेंकटगिरी, जगन्नाथपुरी, अमरनाथ, पशुपती, गंगासागर ही महाक्षेत्रांची यात्राही परमपावन आहे. 

काही जण सोमनाथ, मल्लिकार्जुन (श्रीशैल), महाकाल (उज्जैन), ओंकारेश्वरम, वैद्यनाथ (परळी), भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ (औंढ्या), विश्वेश्वर (वाराणशी), त्र्यंबकेश्वर (नाशिक), केदारेश्वर, घृष्णेश्वर अशा बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करतात. काही देवीभक्त साडेतीन शक्तिपीठांची यात्रा करतात. महाराष्ट्रातील रेणुका, करवीरचही महालक्ष्मी, वणीची सप्तश्रुंगी, तुळजापूरची भवानी, कोलकाता येथील काली, हिमालयातील वैष्णवदेवी, आसामची कामाक्षी, गोव्यातील शांतादुर्गा, आर्यादुर्गा, महालसा, महाकाली, दक्षिणेतील मीनाक्षी, वाराणशीची अन्नपूर्णा अशा शक्तिस्थानांची यात्रा करतात. सर्व शक्तिपीठांचे दर्शन घेणे अवघड आहे, म्हणून महत्त्वाच्या शक्तीपिठांचे दर्शन घेतले जाते. 

काही वैष्णव लोक वेंकटगिरी, गुरुवायूर, मंत्रालय, रायरी, पंढरपूर अशी विष्णूस्थानांची यात्रा करतात. काही दत्तपंथी गिरनार, पीठापूर, कारंजा, औदुंबर, कुरवपूर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट इ. दत्तक्षेत्राचे दर्शन घेतात. काही गणेशभक्त आपापल्या प्रांतातील अष्टविनायकांचे दर्शन घेतात. कृष्णभक्त अयोध्या, मथुरा, वृंदावन, गोकुळ या कृष्णस्थानांची यात्रा करतात. 

यात्रेचा नियम 

यात्रेचा नियम असा आहे, की यात्रा करण्यापूर्वी गणपती, ब्राह्मण, साधूसंत व पितरांचे आशीर्वाद घेऊन यात्रेस प्रारंभ करावा. यात्रेचा अर्थ मनोरंजन, पर्यटनापेक्षाही जास्त परमार्थाचा बोध आणि परमार्थाची ओढ निर्माण होणे असा आहे. वैयक्तिक यात्रा परमार्थाची अनुभूती देणारी ठरते. धार्मिक स्थळांचे दर्शन घेताना त्या जागेचे, परिसराचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. यात्रा किती झाल्या हे महत्त्वाचे नसून त्या कशा झाल्या व आपल्याला काय अनुभूती आली, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. त्याचा वृथा अभिमान बाळगू नये.

Web Title: Why does Dharmashastra insist on pilgrimage? What is achieved and what are the benefits? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.