गुरुकृपेचा अनुभव कथन करताना माउलींना 'मोगरा फुलला' हेच रूपक का वापरावेसे वाटले? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:06 PM2021-12-01T16:06:10+5:302021-12-01T16:06:37+5:30

संत सांगतात, बागेतल्या कळ्या एवढ्या आनंद देतात, तर आयुष्यात मोगरा फुलेल, तो किती आनंद देईल याची कल्पना करा. 

Why did Mauli want to use the metaphor 'Mogra Phulala' while narrating the experience of Guru's grace? Read ... | गुरुकृपेचा अनुभव कथन करताना माउलींना 'मोगरा फुलला' हेच रूपक का वापरावेसे वाटले? वाचा... 

गुरुकृपेचा अनुभव कथन करताना माउलींना 'मोगरा फुलला' हेच रूपक का वापरावेसे वाटले? वाचा... 

googlenewsNext

आपण बहरात आल्याची वर्दी फुलांना द्यावी लागत नाही, त्यांचा परिमळ त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देतो. तीच बाब मोगरीच्या कळ्यांची. वाऱ्याच्या झुळुकेसरशी येणारा मोगऱ्याचा दरवळ मनाचा गाभारा व्यापून टाकतो. आपल्या बागेतल्या रोपट्याला मोगरीच्या कळ्या आल्या आणि बहरल्या, तरी आपल्याला किती हायसे वाटते! संत सांगतात, बागेतल्या कळ्या एवढ्या आनंद देतात, तर आयुष्यात मोगरा फुलेल, तो किती आनंद देईल याची कल्पना करा. 

भक्ताच्या परमार्थ जीवनात साधकदशेपासून सिद्धावस्थेपर्यंत जी वाटचाल होते, तिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका अभंगात सुंदर रुपकाच्या माध्यमातून सूचित केले आहे. भक्ताला आत्मज्ञान होते. 'अहं ब्रह्म अस्मि' मीच परब्रह्म आहे. परमेश्वराचा अंश माझ्या ठिकाणी आहे. हा आत्मानुभव व्यक्त करताना ज्ञानदेव म्हणतात,

इवलेसे रोप लावियले द्वारी,
तयाचा वेलु गेला गगनवरी।
मोगरा फुलला, मोगरा फुलला।
फुले वेचिता अतिभारू कळियांसी आला।
मनाचिये गुंती गुंफियला शेला,
बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला।

आपल्या अंगणात अंकुरलेल्या इवल्याशा रोपाचा केवढा वाढविस्तार झाला, हे सांगताना ज्ञानदेव सांगतात, `माझ्या दाराजवळ मी आत्मविद्येचे लहानसे रोप लावले. त्या रोपाचा वेल बघता बघता बहरला. वेल आकाशभर पसरला. हा वेल मोगऱ्याचा होता. तो पानोपानी पुâलला. त्याच्यावर भावार्थाची असंख्य फुलं उमलली. पहिली फुलं वेचावीत, तोवर पुन्हा अनेक कळ्यांचा बहर येतच होता. त्या भाव-फुलांचा सुगंध हार मी गुंफला. रखुमाईचा पती व माझा पिता श्रीविठ्ठल यांच्या गळ्यामध्ये तो हार मी समर्पण केला.'

कविता म्हणजे भावनाशील मनाचा उचंबळून आलेला उद्गार हे या अभंगाला लागू पडते. ज्ञानदेवांची ही रचना म्हणजे पारमार्थिक भावकविता आहे. आत्मसाक्षात्काराची दिव्य अनुभूती एका प्रकट भावगीताचं रूप घेऊन या ठिकाणी व्यक्त झाली आहे. हे काव्य म्हणजे भाषेतील संगीत आहे.

ज्ञानदेवांच्या या अभंगातील निखळ सौंदर्य केवळ अपूर्व आहे. मोगरीच्या फुलांचा रंग पांढराशुभ्र आहे. त्या फुलांचा गंध सौम्य, मधुर आहे. मोगरीचा वेल हिरव्या पानांनी बहरलेला आहे. त्या वेलीने आकाश व्यापून टाकले आहे. असंख्य कळ्या हळूहळू उमलत आहेत. कळ्यांची फुले होत आहेत. या सर्वांचा मिळून येणारा एकात्म अनुभव या कळ्यांसारखा उमलत गेला आहे. 

पानोपानी बहरलेला मोगरा आणि भक्तीने भरून आलेले भक्ताचे अंत:करण या दोहोंतील एकरूपता आपल्या हृदयाचा ठाव घेतो. इवल्याशा रोपाप्रमाणे हा अभंग इवलासा आहे. हे इवलेपण नाजूक आणि सुंदर आहे. अभंग अल्पाक्षर असूनही आशयबहुल आहे. त्यया अखेरीची बाप रखुमादेवीवरू ही मुद्रिका ज्ञानदेवांची नाममुद्रा आहे. अभंगभर भराऱ्या घेणारी ज्ञानदेवांची प्रिती या नाममुद्रेपाशी येऊन थांबली आहे. 

समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी समाजकार्याचे इवलेसे रोप लावले. त्याची मशागत केली. खतपाणी घातले आणि पाहता पाहता त्याचा वेल गगनापर्यंत जाऊन पोहोचला. असा मोगरा कोणा एकाला नाही, तर सर्वांना दीर्घकाळ आनंद देतो. असाच मोगरा आपल्याही कार्यातून बहरत राहावा आणि तो विठ्ठलचरणी अर्पण करत राहावा, हीच या अभंगाची फलश्रुती!

Web Title: Why did Mauli want to use the metaphor 'Mogra Phulala' while narrating the experience of Guru's grace? Read ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.