संत कबीर संत जनाबाईंना भेटायला गेले, तेव्हा त्या चक्क भांडत होत्या; पण कशासाठी? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 13, 2021 12:00 PM2021-02-13T12:00:00+5:302021-02-13T12:00:02+5:30

'काम असावा ईश्वर' या उक्तीची प्रचिती देणारी गोष्ट!

When Saint Kabir went to meet Saint Janabai, she was arguing; But why? Read on! | संत कबीर संत जनाबाईंना भेटायला गेले, तेव्हा त्या चक्क भांडत होत्या; पण कशासाठी? वाचा!

संत कबीर संत जनाबाईंना भेटायला गेले, तेव्हा त्या चक्क भांडत होत्या; पण कशासाठी? वाचा!

googlenewsNext

काम सगळेच करतात, पण काही जण कामात राम शोधतात तर काही जण कामात राम ओततात. संत कबीरांनी संत जनाबाईंची भेट घेतली, त्यावेळेस त्यांना जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीची आणि त्यांच्या अधिकाराची प्रचिती आली. परंतु, ती भेट थोडी मजेशीर होती. संत जनाबाई या नावाभोवती शांत, सात्विक भाव असलेली व्यक्ती संत कबीरांना अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्ष भेटीतले चित्र काही वेगळेच होते. संत जनाबाई सांसारिक स्त्रियांसारख्या चक्क भांडत होत्या. परंतु हे भांडण देखील परमार्थाची अनुभूती देणारे भांडण होते. 

संतराज कबीर, संत जनाबाईंचे फक्त नाव ऐकून होते. त्यांना भेटावे म्हणून ते एकदा त्यांच्या गावी आले. गावाबाहेर पाणवठ्यावर दोन बायका कचाकचा बांडत होत्या. 'जनाबाई कोठे राहतात', असे त्यांना विचारायची सोय नव्हती. ते तसेच पुुढे आले. दहा बारा वर्षाच्या एका मुलाला त्यांनी तो प्रश्न विचारला, 'जनी व्हय? ती नव्ह का भांडतीय ती!' असे म्हणून पोरगा चालता झाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास न बसल्यामुळे कबीरांनी तोच प्रश्न पुढे होऊन एका मोठ्या माणसाला विचारला. त्यानेपण तेच उत्तर दिले. शेवटी त्या बाईजवळ ते आले व म्हणाले, 
'संत जनाबाई आपणच काय?

भांडणाच्या सुराचे एकदम सुस्वरात रुपांतर होऊन उत्तर आले, 'होय मीच जनी, विठ्ठलाची जनी!' त्यावर कबीर म्हणाले, 'संत असून भांडणाचा पवित्रा?' त्यावर जनाबाईंनी समोरील गोवऱ्यांच्या दोन सारख्या ढीगांकडे बोट दाखवून म्हटले, `हे दोन्ही ढीग सारखेच दिसतात, खरे ना? परंतु हा उजवीकडील ढीग माझा आहे. व ही गंगी ते मान्यच करत नाहीये. सरळ सांगून पटत नाही, आता दाखवतेच तिला माझा इंगा.'

एवढे बोलून त्या बाईला जनाबाई म्हणाली, 'काय ग तुझ्या ढिगाला काही खूण आहे?' 
त्यावर गंगी वैतागून म्हणाली, गोवऱ्यांना कसली आलीय डोंबलाची खूण? सर्व गोवऱ्या सारख्याच दिसतायत डोळ्यांना.' 
त्यावर हात कमरेवर ठेवून जनाबाई ठसक्यात म्हणाली, 'गंगे तोंड सांभाळून बोल. कामे तर सगळेच करतात, पण कशी करतात हा प्रश्न आहे. या उजव्या ढिगातील प्रत्येक गोवरी कानाला लावून बघ, त्यातून 'विठ्ठल विठ्ठल' आवाज आला नाही, तर नावाची जनी नाही.'

तिच्या या भाषणाने गंगीच नाही, तर संत कबीरांसकट सर्व मंडळी पुढे आली आणि सर्वांना जनीच्या बोलण्याची प्रचिती आली. जनीच्या चेहऱ्यावर तेव्हा 'संत काही बावळट नसतात', हे सांगणारे मिस्कील भाव आणि कटेवर हात ठेवून उभी असलेल्या रुख्मिणीसारखी देहबोली होती. तिचे ते रूप पाहून संत कबीरांना जनीच्या विठ्ठल भक्तीची प्रचिती आली. या प्रसंगावरून समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील श्लोकआठवतो- 

सदा देवकांजी झिजे देह ज्याचा 
सदा रामनामे वदे नित्य वाचा,
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। श्रीराम।।

 

Web Title: When Saint Kabir went to meet Saint Janabai, she was arguing; But why? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.