What is salvation? | मोक्ष म्हणजे तरी काय...?

मोक्ष म्हणजे तरी काय...?

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

आपल्या भारतीय धर्मशास्त्राने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांना नितांत महत्त्व दिले आहे. मनुष्य देहातच या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करता येते इतर देहात हे कालत्रयी शक्य नाही.

आपल्या सर्वांना काही प्रश्न सतत पडत असतात ते असे की, 
मोक्ष म्हणजे नेमके काय...?
तो कुठे असतो..?
कुठे गेले म्हणजे तो प्राप्त होतो..?

तर लक्षांत घ्या की, मोक्ष आकाशात नाही, पाताळात नाही, भूतलावर नाही. मोक्ष तर आज, आत्ता, इथेच मिळवता येतो. शिवगीताकार मोक्षाचे वर्णन करतात -

मोक्षस्य न हि वासोडस्ति न ग्रामांत्तर मेव ना ।
अज्ञान ह्रदयग्रंथि नाशो मोक्ष इति स्मृत: ॥ 

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

देहाच्या ठिकाणी अहं आणि मम हे दोन भाव सतत निर्माण होत असतात. या भावापासून वेगळे होणे, भावातीत होणे म्हणजे मोक्ष..! देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की जीवाला बंध प्राप्त होतो व आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की मोक्ष प्राप्त होतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे खरं तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही यासाठी आत्मज्ञानाचीच गरज असते.

रज्जूवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरिता कुठले शस्त्र वापरणार..? अहो.! दोरीवर सापाचा भास झाला तो घनदाट किर्र्  अंधारामुळे. हा फक्त भास झाला आहे. तो साप आहे की दोरी याचे ज्ञान फक्त प्रकाशानेच होणार आहे. तसे देह म्हणजेच मी या अज्ञान ग्रंथीची निवृत्ती फक्त आत्मज्ञानाच्या प्रकाशानेच होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

वाचुनी ज्ञानेविण एके ।
उपाय करिसी जितुके ।
तिही गुंफसि अधिके ।
रुखी इथे ॥

एका आत्मज्ञानावाचून या वृक्षाला छेदण्याचे जेवढे म्हणून आपण प्रयत्न करू तेवढे आपण अधिक बंधनात पडू. हे आत्मज्ञान याच देहात, जिवंतपणी प्राप्त करावयाचे आहे. मोक्ष काही मृत्यूनंतर मिळविण्याचे साधन नाही. मोक्ष हा जिवंतपणी घ्यावयाचा अनुभव आहे.

ज्ञानराज माऊली म्हणतात -

मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ।
ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥

दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।
झाका झाकी त्यास कासयाची ॥

जवंवरी देह आहे तवंवरी साधन ।
करूनिया ज्ञान सिद्ध करा ॥

आहे मी हा कोण करावा विचार ।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: What is salvation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.