आजच्या यांत्रिक युगात आपण हसणं जवळपास विसरत चाललो आहोत. हास्याची छोटीशी लकीर आपल्या सबंध देहाला विश्रांती देते. बालपणी हसायचो तसे खळखळून आपण शेवटचे कधी हसलो होतो, हे जरा आठवून बघा! आश्चर्य वाटले ना? हसण्यासाठी लाफ्टर क्लब जॉईन करावे लागतील असा कधी आपण विचारही केला नसेल. परंतु जी गोष्ट फुकट आहे, बिनकष्टाची आहे आणि कोणालाही करता येणार आहे, ती करण्यापासून आपण स्वतःला का रोखत आहोत?
ती सोपी गोष्ट म्हणजे स्मित हास्य...छोटीशी स्माईल. जी आनंद फुलवते आणि दुसऱ्यालाही आनंद देते. अशा आनंदी व्यक्ती दुर्मिळ होत चालल्या आहेत. ज्या आहेत त्यांच्या आयुष्यात दुःखं नाही असे नाही, परंतु त्यांना हसून संकटावर मात करण्याची कला अवगत झालेली आहे. चला आपणही त्यांच्यापैकी एक बनण्याचा प्रयत्न करूया. सतत ताणलेले, रागीट, आढ्यतेचा मुखवटा घेऊन वावरण्यापेक्षा छान हसुया. आनंदाचं झाड आपोआप आपल्याही अंगणात रुजेल, वाढेल आणि बहरेल.
एका छोट्याशा स्मित हास्याची किंमत माहितीये?
>>डॉक्टरांनी स्मित हास्याने रुग्णाची तपासणी केली, तर रुग्णाचे अर्धे दुखणे बरे झाल्यासारखे वाटू लागते.
>>शिक्षकांनी वर्गात प्रवेश करताना स्मित हास्याने मुलांचे स्वागत केले तर मुलांची अभ्यासात रुची वाढते.
>>गृहिणीचा घरातील वावर प्रसन्न चेहऱ्याने असेल तर घरातील इतर सदस्यांनाही मोकळीक जाणवते आणि वातावरण आनंदी राहते.
>> कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही दिवसभराचे काम संपवून सायंकाळी आनंदाने घरात प्रवेश करत असाल तर तुमची वाट पाहणाऱ्या घरातील इतर सदस्यांनाही तेवढाच आनंद होतो.
>>बॉस म्हणून तुम्ही एखाद्या कार्यालयात किंवा कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत असाल, तर तुमचे स्मित हास्य कर्मचाऱ्यांना आनंदाने काम करण्यास प्रवृत्त करते.
>>दुकानदार म्हणून तुम्ही आनंदाने ग्राहकाचे स्वागत करत असाल तर तुमचा ग्राहक वारंवार तुमच्याकडूनच खरेदी करण्यास प्राधान्य देईल.
>>रस्त्याने जाताना एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही दिलासादायक स्मित केलेत तर काही क्षण का होईना समोरची व्यक्ती आपले दुःखं विसरून तुम्हाला पाहून स्मित करते.
आनंद हा संसर्गजन्य आहे. तो आपल्याला पसरवायचा आहे. आनंद हवा असेल तर आनंद द्यायलाही शिका. दुखणी, खुपणी, त्रास रोजचेच आहेत. त्यावर स्मित हास्याने मात करता येते. याबाबत श्रीकृष्णाचा आदर्श ठेवता येईन. जन्माच्या आधीपासून मृत्यूपर्यंत मृत्यूशी झुंज देताना त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित कधीही कमी झाले नाही. विज्ञानही सांगते, जो जितका आनंदी राहतो, तो तितका निरोगी आणि दीर्घायुषी होतो. तर मग, देताय ना एक गोड स्माईल?