पाण्यात प्रचंड ताकद असते. दोन घोट पाणी प्यायल्याने ताजे तवाने वाटते. ऋतुमानानुसार गरम-थंड पाण्याने अंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. स्वच्छ अंघोळ झाली की त-मनाला तजेला जाणवतो, एवढेच काय तर पाणी हे ऊर्जानिर्मितीचे माध्यम म्हणूनही वापरले जाते. मात्र हेच पाणी नकारात्मक उर्जेला आमंत्रण ठरू शकते. याबाबत देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी वास्तू नियम सांगितला आहे, तो पुढीलप्रमाणे -
महाराज म्हणतात, 'अंघोळ झाल्यावर तुमच्या मोरीत पाणी तसेच शिल्लक राहत असेल किंवा बादली आणि मग घेऊन तुम्ही अंघोळ करत असाल आणि बादलीत पाणी शिल्लक राहिले असेल तर तुमच्या वास्तू मध्ये नकारात्मक ऊर्जेला ती कारणीभूत ठरू शकते.
ते सांगतात, शास्त्रानुसार काही सवयी अंगभूत असल्या पाहिजे, जसे की झोपून उठल्यावर अंथरूण आणि पांघरूण यांची घडी आपणच आपली घातली पाहिजे. अंघोळ झाल्यावर खराट्याने मोरी झाडून काढले पाहिजे. आपल्या आंघोळीचे पाणी मोरीत शिल्लक राहता कामा नये. एवढेच नाही, तर आपण वापरलेली पाण्याची बादली रिकामी करून ती पालथी घालून ठेवली पाहिजे. त्यातही पाणी शिल्लक राहता कामा नये.
तार्किक दृष्ट्या विचार केला तर लक्षात येते, पाण्याने मोरी निसरडी होते आणि आपल्या नंतर येणारी व्यक्ती बेसावधपणे पाऊल टाकते. अशा वेळी अपघाताने पाय सटकून व्यक्ती पडण्याची शक्यता बळावते आणि डोक्याला मार लागू शकतो. म्हणून आपली अंघोळ झाल्यावर मोरी स्वच्छ करणे सर्वांच्याच हिताचे ठरते. तसेच आपण वापरलेली वस्तू आपण उचलून ठेवावी ही चांगली शिस्त आहे. त्यानुसार आपली बादली आणि मग रिकामा करून पालथा घालून ठेवला असता साचलेल्या पाण्यातून रोगराई पसरण्याचा धोका टळतो आणि नंतर येणाऱ्या व्यक्तीला स्वच्छ झालेली बादली, मग नव्याने वापरता येते.
महाराज तिसरी चांगली सवय सांगतात, लहान मुलांना नकळत्या वयापासून कामाची आणि स्वावलंबनाची सवय लावा. प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून ठेवू नका. स्वतःचे अन्न स्वतः ताटात वाढून घेणे, स्वतःच्या कपड्यांची घडी करणे, आपली खोली आवरणे आणि घरातील वडीलधाऱ्यांना यथाशक्ती मदत करणे.
या तीन सवयी लहानपणापासून लावल्या तर आयुष्यभर कामी येतात आणि स्वावलंबन अंगी बाणल्यामुळे घरात कलह रुपी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
टीप : सदर माहिती व्हिडीओच्या आधारे दिलेली असून लोकमत सदर माहितीला पुष्टी देत नाही.