Vaishakh Mohini Ekadashi May 2025 Vrat Puja In Marathi: मराठी वर्षातील दुसरा वैशाख महिना सुरू झाला आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते. मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष व्रतपूजन केले जाते. श्रीविष्णूंचे पूजन करून त्यांचा शुभाशिर्वाद प्राप्त करायचा असेल, तर एकादशी सर्वोत्तम मानली गेली आहे. वैशाख मोहिनी एकादशी कधी आहे? मोहिनी एकादशीला व्रत पूजा विधी कसा करावा? जाणून घेऊया...
मराठी वर्षात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. गुरुवार, ०८ मे २०२५ रोजी मोहिनी एकादशी आहे. ०८ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी वैशाख शुद्ध एकादशीची सांगता होणार आहे.
मोहिनी एकादशी व्रत पूजन विधी
मोहिनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय, हा १०८ वेळा जप करावा.
मोहिनी एकादशी व्रत पूजनाची सांगता
एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी. प्रभू श्रीरामांनी मोहिनी एकादशीचे व्रत केले होते, अशी मान्यता आहे.
मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला घडली, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.