On the Tripuri full moon, Lord Mahavishnu took the Matsyavtar; Learn the diverse significance of this day! | त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महाविष्णूंनी घेतला होता मत्स्यावतार; या दिवसाचे आहे विशेष महत्त्व!

त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महाविष्णूंनी घेतला होता मत्स्यावतार; या दिवसाचे आहे विशेष महत्त्व!

कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा अनेक कारणांमुळे महत्त्वाची ठरते. वैकुंठ चर्तुदशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावे साजरा केला जातो. ३० नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. तसेच भगवान शंकरांना त्रिपुरारी अशी ओळख मिळाली. 

प्रत्येक वर्षात एकूण पंधरा पौर्णिमा येतात. यंदा अधिक मास आल्यामुळे आणखी एका पौर्णिमेची त्यात भर पडली आहे. त्यातही त्रिपुरी पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. कार्तिक स्नानाची समाप्ती या दिवशी होते. त्यामुळे कार्तिक मासात पहाटे उठून स्नान करण्याची संधी जर तुमच्या हातून निसटली असेल, तर किमान त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून सचैल स्नान करावे आणि गंगेचे स्मरण करावे. तसे केल्याने कार्तिक मासातील गंगा स्नानाचे पुण्य लाभते. 

हेही वाचा : कार्तिक मास हा दामोदर मास म्हणूनही ओळखला जातो, ते पुढील कारणांसाठी...

त्रिपुरी पौर्णिमेला चार्तुमासाची सांगता होते. या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडातरी अंधार दूर व्हावा, ही दीपदानामागील सद्भावना असते. दिवाळीप्रमाणे दिव्यांची आरास करून मोठा उत्सव साजरा केला जातो. 

पुराण काळापासून त्रिपुरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. भगवान महाविष्णूंनी दशावतारापैकी पहिला मत्स्य अवतार याच दिवशी घेतला होता. राजा सत्यव्रताच्या रक्षणार्थ हा अवतार भगवंतांनी घेतला होता.

कार्तिक पौर्णिमेला चंद्रोदय झाला, की शंकराच्या पिंडीला अभिषेक घालावा़  रुद्रपठण किंवा श्रवण करावे आणि भक्तीभावाने चंद्रदर्शन घ्यावे. 

प्रबोधिनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.

हेही वाचा : Tulasi vivah 2020 : तुलसी विवाह मुहूर्त, तिथी आणि विधी

Web Title: On the Tripuri full moon, Lord Mahavishnu took the Matsyavtar; Learn the diverse significance of this day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.