Tilkunda Chaturthi 2024: तिलकुंद चतुर्थीनिमित्त आज घरच्या घरी बनवा तिळगुळाचे मोदक; वाचा रेसेपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:02 PM2024-02-12T15:02:02+5:302024-02-12T15:04:47+5:30

Tilkunda Chaturthi 2024: आज तिलकुंद चतुर्थी आणि उद्या माघी गणेश जन्म, उद्या उकडीचे मोदक सगळेच करतील, पण आज आस्वाद घ्या तिळगुळ मोदकांचा!

Tilkunda Chaturthi 2024: Make Tilgula modak at home today on the occasion of Tilkunda Chaturthi; Read the recipe! | Tilkunda Chaturthi 2024: तिलकुंद चतुर्थीनिमित्त आज घरच्या घरी बनवा तिळगुळाचे मोदक; वाचा रेसेपी!

Tilkunda Chaturthi 2024: तिलकुंद चतुर्थीनिमित्त आज घरच्या घरी बनवा तिळगुळाचे मोदक; वाचा रेसेपी!

मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते. म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रतांची सांगड तीळाशी घातल्याचे निदर्शनास येते. मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ मास सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आली आहे. १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५.४६  मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरु होत आहे आणि १३ फेब्रुवारी दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी चतुर्थी संपत आहे. ही तिथी १३ फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्याने दोन्ही दिवशी हे व्रत यथाशक्ती करता येईल. हे व्रत कसे करायचे ते जाणून घ्या. 

चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून शुचिर्भूत व्हावे. अथर्वशीर्षाची आवर्तने करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा. कुंकू लावावे. फुलं वाहावीत. तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चतुर्थीच्या निमित्ताने गरिबाला तीळ आणि कोरडा शिधा अर्थात धान्य दान करावे. 'गं गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. काही भाविक या तिथीला उपास करतात आणि संकष्टीला चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतात तसा हा उपास चंद्र दर्शन घेऊन सोडतात. जर उपास शक्य नसेल तर देवदर्शन, नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय अवश्य करावेत. 

यानिमित्ताने आपण शिकणार आहोत तिळगुळ मोदक; या चविष्ट मोदकांचा नैवेद्य बाप्पाला द्या आणि तुम्हीदेखील त्याचा आस्वाद घ्या. वाचा सविस्तर रेसेपी!

साहित्य:
१/२ किलो तिळ
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप
मोदक बनवण्याचा साचा 

कृती:
१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच  सारण ताटात काढून घ्यावे. मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावावे आणि त्यात सारण भरावे. सारण व्यवस्थित भरून आकार दिला की साचा उघडावा, मोदक अलगद बाहेर येतील.

तिळगुळाचे लाडू आपण करतोच, मोदकाचा आकार देऊन त्याचेच मोदक केले की बाप्पा खुश आणि घरची बच्चे कंपनी पण खुश!

Web Title: Tilkunda Chaturthi 2024: Make Tilgula modak at home today on the occasion of Tilkunda Chaturthi; Read the recipe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.