बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही; वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 20, 2021 15:54 IST2021-01-20T15:54:08+5:302021-01-20T15:54:28+5:30

सुरीने केलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाहीत. त्याचे व्रण कायमस्वरूपी मनावर राहतात. म्हणून बोलताना शेकडो वेळा विचार करून बोलले पाहिजे. 

Think before you speak, not after you speak; Read this story! | बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही; वाचा ही गोष्ट!

बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही; वाचा ही गोष्ट!

आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची खोड असते. परंतु समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बोलू नये, हा नियम आहे. मात्र आपल्या एका वाईट सवयीमुळे अनेक गैरसमज, वाद, अपमान होतात. परिस्थिती वेगळीच असते आणि आपण चुकीचे व्यक्त होतो. नंतर मागितलेल्या माफीला किंमत उरत नाही. कारण शब्दांमुळे झालेले घाव सहसा भरून निघत नाहीत. यासाठीच शब्द जपून वापरा आणि वापरण्याआधी विचार करा, वापरून झाल्यावर नाही. 

एका आश्रमात काही शिष्य अध्ययनन करत होते. गुरुदेव त्यांना विविध विषय शिकवत असत. शिष्यांना सर्व विद्या व कला अवगत व्हाव्यात यादृष्टीने ते सतत प्रयत्नशील असत. त्या शिष्यांमध्ये शामल नावाचा एक शिष्य होता. तो कोणालाही उद्धटपणे बोलून जात असे. दुसऱ्याला काय वाटेल, कुणाचे अंत:करण दुखावले जाणार नाही ना, याची त्याला पर्वा नसे. गुरुदेवांनाही त्याची काळजी वाटू लागली. परंतु ते त्याच्यावर कधी रागावले नाहीत.

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

गुरुदेवांनी एकदा त्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले, 'शामल, बेटा एक काम करशील का?'
तो हो म्हणाला.

मऊमऊ पिसांची गच्च भरलेली एक पिशवी त्याच्या हाती देत गुरुदेव म्हणाले, 'बाळ ही पिशवी मोकळ्या मैदानात जाऊन रिकामी करून ये.'
गुरुदेवांच्या आज्ञेनुसार शामलने मैदानात जाऊन पिसांची पिशवी रिकामी केली नि तो परत गुरुदेवांकडे आला. दुसऱ्या दिवशी गुरुदेवांनी त्याला सांगितले, 'शामल, ही पिशवी घे आणि सगळी पिसं पुन्हा यात भरून आण.' 

शामल मैदानात गेला. तिथे ढिगारा नव्हता. सगळी पिसं वाऱ्याने दूरवर इतरत्र उडून गेलेली आढळली. रिकामी पिशवी घेऊन तो परत आला. म्हणाला,` गुरुदेव, क्षमा करा. एकही पिस मैदानात नाही. सगळी पिसं वाऱ्याने विखुरली गेली.'

गुरुदेव त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, `बाळा, एकदा उडून गेलेली पिसं जशी पुन्हा आणणे कठीण आहे, तसे बोलून गेलेले शब्द परत येत नाहीत. आपण उच्चारलेला शब्द कोणाच्या जिव्हारी लागू नये यासाठी आपण नेहमी विचार करूनच बोलावे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणे चांगले. शामलला आपली चूक समजली. पुढे तो नम्र शिष्य म्हणून गणला जाऊ लागला.

म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर लिहितात, 'शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी..!'

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

Web Title: Think before you speak, not after you speak; Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.