आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 28, 2021 12:05 PM2021-04-28T12:05:32+5:302021-04-28T12:16:15+5:30

आजचा काळ सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. माणूस तर आपण आहोतच, थोडी माणुसकीही दाखवूया. 

These two recent events of the week changed the way we look at life! | आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली!

आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली!

Next

ज्योत्स्ना गाडगीळ 

पहिली घटना : मध्य रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके मुबंई पुणे मार्गावरील वागंणी स्टेशनवर कर्तव्य बजावत होता. १७ एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवर चालत असताना तीच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने एक्सप्रेस येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ७ सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पॉईंटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्हीवर कैद झाली. पुढे काही तासातच मयुर शेळके यांनी त्या मुलाला वाचवलेल्या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.आणि काही तासातच मयुर शेळके च्या पराक्रमाची चर्चा पूर्ण देशभरात सुरु झाली. कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. त्यानतंर मयुर शेळकेचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला. 

दुसरी घटना : ८५ वर्षांचे नारायण दाभाडकर. नागपूरचे रहिवासी. त्यांच्यासकट सगळं कुटुंब कोरोनाग्रस्त असताना महत्प्रयासाने त्यांना बेड उपलब्ध होतो. ऑक्सिजन पातळी ५५ पर्यंत गेलेली असते. तेव्हाच त्यांना एका बाईची तिच्या नवऱ्याला ऑक्सिजन मिळवण्याची धडपड दिसते. ते जावयांना बोलावून घेतात. आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असे सांगतात. आपला बेड रिकामा करून त्या बाईच्या नवऱ्याला तो बेड उपलब्ध करून द्यावा अशी तजवीज करायला सांगतात. त्यांचे कुटुंबीय आणि उपचार करणारे डॉक्टर त्यांना तसे करण्यास नकार देतात. पण स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करून ते दुसऱ्या जीवाला जीवदान देऊ पाहतात. तशी लेखी विनंती करतात. पुढच्या दोन तासात नारायणराव स्वगृही परत जातात आणि दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतात.

या दोन्ही घटना जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकतात. त्यांच्या जागी आपण असतो, तर आपल्याला तसे करणे जमले असते का? हा साधा विचार केला तरी मनाचा थरकाप होतो. त्यांनी तर प्रत्यक्ष कृती करून समाजाला आदर्श घालून दिला. यातून आणखी एक बोध मिळाला, की दान करण्यासाठी प्रत्येकाला रतन टाटा होणे शक्य नाही, परंतु दानत अंगात असेल तर कुठल्याही पद्धतीने दान किंवा मदत करता येते. या दोहोंनी त्यांच्या परीने मदत केली. आपल्याला कदाचित मयूरसारखे शौर्य दाखवता येणार नाही, किंवा नारायण रावांसारखे उदार होता येणार नाही, पण अडल्या नडलेल्याला जमेल तसा मदतीचा हात नक्कीच पुढे करता येईल. आजचा काळ सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. माणूस तर आपण आहोतच, थोडी माणुसकीही दाखवूया. 

एका दोह्यात वर्णन केले आहे, पशूंच्या शरीराचा मृत्युपश्चातही उपयोग होतो, तर मानव देहाचा जिवंतपणी आणि मरणोत्तर सदुपयोग झाला, तर नर देखील नारायण होईल. निरपेक्ष बुद्धीने तोच प्रयत्न आपल्याला करायचा आहे. 

पशु कि पनिया बने नर का कछु नहीं होए
जो नर करनी करे तो नर से नारायण होए।

Web Title: These two recent events of the week changed the way we look at life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.