Shani Sade Sati 2025: २०२५ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. यावर्षी नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे आणि अधिक प्रभावकारी ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याचा केवळ राशी, मूलांक यावर नाही, तर देश-दुनियेवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते आहे. यंदाच्या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन राशींना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील एका राशीची साडेसाती संपणार असून, दोन राशींवरील शनिचा ढिय्या प्रभाव संपुष्टात येणार आहे. परंतु, याच वेळी एका राशीची साडेसाती सुरू होणार असून, दोन राशींवर ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे.
नवग्रहांमध्ये शनि हा मंदगतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिने मीन राशीत प्रवेश केला की, पुढील अडीच वर्ष याच राशीत असणार आहे. शनिच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे विद्यमान घडीला राहु ग्रह मीन राशीत आहे. मे महिन्यात राहु कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत शनि आणि राहुची युती मीन राशीत होणार आहे. याचा मोठा प्रभाव दिसू शकणार आहे.
कोणत्या राशीची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे?
शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. तर, सिंह आणि धनु राशींवरील ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. आगामी काळ या तीनही राशींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो, संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. अशावेळी काही उपाय अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात, असे म्हटले जात आहे.
साडेसातीत नेमके उपाय करावेत?
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.