....पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:02 PM2021-04-15T12:02:31+5:302021-04-15T12:02:47+5:30

समंजसपणे प्रत्येकाने परिस्थिती हाताळली, तर वाद होतीलच कशाला?

Stop blaming others; Read this parable! | ....पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; वाचा ही बोधकथा!

....पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; वाचा ही बोधकथा!

googlenewsNext

आपण जेव्हा समोरच्यावर दोषारोप करण्यासाठी बोट उगारतो तेव्हा बाकीची चार बोटे आपल्याकडे असतात. म्हणजेच चूका फक्त दुसऱ्यांकडून होतात असे नाही, त्या सगळ्यांकडूनच होतात. पण म्हणतात ना, आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते. परंतु, ही सवय वाईट आहे. आपण आधी आपल्या चूका मान्य करायला शिकले पाहिजे. दुसऱ्यातील दोष दाखवत असताना, स्वत:चे दोष सुधारले पाहिजेत. 

एक लग्न झालेले जोडपे होते. दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. परंतु, लग्नानंतर बारा वर्षे झाली, तर आपत्यप्राप्ती झाली नव्हती. अनेक वैद्यकीय उपचारानंतर त्यांना पूत्रप्राप्ती झाली. त्या बाळावर दोघांचा खूप जीव होता. बाळ दिसामासाने मोठे होत होते. 

एक दिवस नवरा आजारी असतान डॉक्टरांनी दिलेले औषध घेऊन ऑफिसला जायला निघाला. त्याने औषध घेतले पण झाकण लावायला विसरला. आठवण येताच त्याने बायकोला फोन करून बाटलीला झाकण लावायला सांगितले. फोनवर हो म्हणून फोन ठेवताच ती आपल्या कामात गुर्फटून गेली. शांत झोपलेल्या बाळाला जाग कधी आली, ते तिला कळलेच नाही. ती स्वयंपाक घरात काम करत असताना बाळ रांगत रांगत बाहेर आले आणि त्याने नेमकी उघडी असलेली बाटली तोंडाला लावली. 

मोठ्यांचे औषध बाळाच्या पोटी गेल्याने आणि औषधाचा मारा झाल्याने बाळ तत्काळ बेशुद्ध पडले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. बाळाची आई काम उरकून बाळाजवळ गेली, तर बाळ खोलीत नव्हते. बाळाला शोधत बाहेर आली, तर बाळ बेशुद्ध होऊन पडले होते. तिने तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली आणि बाळाला हॉस्पिटला नेले. एवढे नवसासायासाने, उपचाराने झालेले बाळ आपल्या मूर्खपणाने आपण गमावणार तर नाही ना याची तिला भीती वाटू लागली. त्याहून जास्त भीती नवऱ्याची होती. कारण त्याने सांगूनही आपल्याकडून चूक घडली होती. तिने घाबरतच नवऱ्याला फोन केला आणि रडत रडत सगळी हकीकत सांगितली आणि माफी मागू लागली. 

नवरा काही काळात तिथे पोहोचला. त्याने बायकोला धीर दिला. सगळे काही ठीक होईल म्हणाला. बायकोला आश्चर्य वाटले. नवरा आपल्याला ओरडेल असे तिला वाटले होते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, बाळाला आता कसलीही भीती नाही. काही वेळात ते शुद्धीवर येईल. काळजी करू नका. 

बायकोने नवऱ्याला कडकडून मिठी मारली आणि दोघांनी देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानले. बायकोने आपली भीती व्यक्त केली, त्यावर नवरा म्हणाला, 'चूक तुझी एकटीची नव्हती. मीच माझे काम पूर्ण करून निघालो असतो, तर ही वेळ आली नसती. म्हणून तुझ्याआधी दोष माझा आहे. असे असताना मला तुझ्यावर चिडण्याचा अधिकारच काय?'

इतक्या समंजसपणे प्रत्येकाने परिस्थिती हाताळली, तर वाद होतीलच कशाला, नाही का?

Web Title: Stop blaming others; Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.