शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
2
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
3
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
4
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
5
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
6
अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 
7
158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
8
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
9
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
10
Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
11
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
12
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
13
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
14
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
15
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
16
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
17
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
18
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
19
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
20
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:35 IST

Shrimad Bhagwat Saptah 2025: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

Shrimad Bhagwat Saptah 2025: हिंदूंच्या अठरा महापुराणांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण. ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा श्रीमद्‌भागवत या नावाने प्रसिद्ध आहे. भागवत पुराण, श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात. श्रीमद् भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; याची रचना बारा स्कंधांत करण्यात आली असून त्यात ३३२ अध्याय व सुमारे १८ हजार श्लोक आहेत. श्रीमद् भागवत पुराणाचा दहावा खंड सर्वांत मोठा, तर बारावा सर्वांत लहान आहे. दहाव्या स्कंधाची पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. विष्णुचा अवतार कृष्ण हा भागवताचा नायक असून त्याच्या भक्तीचे गुणगान त्यात केलेले आहे म्हणून हे एक वैष्णव पुराण मानले जाते. श्रीमद् भागवत हे संसारातले भय आणि दुःख यांचा समूळ नाश करणारे अमृत मानले जाते आणि ते मोक्ष प्रदान करणारे आहे. श्रीमद् भागवत हा एक पवित्र ग्रंथ असून, त्याची कथा आणि निरूपणे देशभरात, विशेषतः भाद्रपद महिन्यात आयोजित केले जातात. 

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा २०२५ मध्ये सोमवार, ०१ सप्टेंबर २०२५ रोजी  श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह प्रारंभ झालेला असून, रविवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी  श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह समाप्ती होणार आहे. श्रीमद् भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत, तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. श्रीमद् भागवत ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. श्रीमद् भागवत ग्रंथाकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचे उत्थान व्हावे आणि हयात असेपर्यंत जीवनात परमोच्च अत्यानंदाची अनुभूति घेता यावी, यासाठी मार्गदर्शन केले आहे.

भागवतधर्म व भक्तिसंप्रदाय यांच्या दृष्टीने प्रमाणग्रंथच

महापुराणात दिलेल्या परंपरेनुसार ते वासुदेवाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकदेवाला आणि शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितले. इतर कोणत्याही पुराणापेक्षा श्रीमद् भागवतावर अधिक टीका झाल्या, हे भागवताच्या लोकप्रियतेचे एक गमकच होय. श्रीमद् भागवत ग्रंथाचा अर्थ लावणे ही विद्यावंतांच्या विद्येची कसोटी आहे, अशी म्हण रूढ झाली आहे. यावरून भागवतातील आशयाचे गांभीर्य व टीकांची आवश्यकताही स्पष्ट होते. भारताच्या सांस्कृतिक जीवनावर भागवताचा फार मोठा प्रभाव पडला आहे. भागवतधर्म व भक्तिसंप्रदाय यांच्या दृष्टीने भागवत हा एक प्रमाणग्रंथच आहे. काव्याच्या दृष्टीनेही त्यातील वर्णने भावपूर्ण व रसात्मक आहेत. प्रचंड वाङ्मय लिहूनही मन:शांती न लाभलेल्या व्यासांना भागवताच्या लेखनामुळे मनःशांती लाभली, असे म्हटले जाते. भागवत ही व्यासांची समाधिभाषा आहे; भागवत हे वेदान्ताचे सार आहे; भागवत ही विद्येची परमावधी वा अंतिम मर्यादा आहे; शब्दप्रधान वेद, अर्थप्रधान पुराण व रसप्रधान काव्य या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता भागवतात आहे, यांसारख्या विधानांवरून भागवताचे माहात्म्य स्पष्ट होते. भागवताच्या पुस्तकाची षोडशोपचार पूजा करण्याची व भागवताची आरती म्हणण्याची पद्धत, भागवताचे सप्ताह-पारायण करण्याची भारतभर रूढ असलेली प्रथा इत्यादींवरूनही भागवताचे जनमानसातील महत्त्वपूर्ण स्थान ध्यानात येते. भागवत सप्ताह साजरा करण्याची परंपरा कधी सुरू झाली? याबाबत पुराणातील एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. 

राजाचा सर्पदंशाने मृत्यू होण्याचा शाप

पौराणिक कथेनुसार, शमीक ऋषी यांच्या आश्रमात पुत्र श्रृंगी यांच्यासह अन्य ऋषिपुत्र अभ्यास करत होते. एक दिवस सर्व विद्यार्थी जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. तेव्हा आश्रमात शमीक ऋषी एकटेच समाधी लावून बसले होते. तहानेने अत्यंत व्याकूळ राजा परिक्षित शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात पाण्याचा शोध घेऊ लागले. ध्यानस्थ असलेल्या शमीक ऋषींना विनम्रपणे नमस्कार करून पाणी देण्याची विनंती केली. दोन-तीन वेळा विनवणी करूनही ऋषींनी डोळे न उघडल्याने समाधीचे ऋषी ढोंग करताहेत, असा समज राजाचा झाला. राजा अत्यंत क्रोधीत झाला. जवळच पडलेल्या एका मृत सापाला ऋषींच्या गळ्यात टाकले आणि तेथून निघून गेले. राजा परिक्षित आश्रमातून जात असल्याचे एका ऋषिकुमाराने पाहिले. ही बाब श्रृंगीला सांगितली. राजाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आश्रमात पोहोचले. शमीक ऋषींच्या गळ्यात साप पाहून श्रृंगी अत्यंत क्रोधीत झाला. वडिलांच्या गळ्यात मृत साप टाकणाऱ्या राजा परिक्षितांचा पुढील सातव्या दिवशी नागराज तक्षकच्या दंशाने मृत्यू होईल, असा शाप श्रृंगीने दिला. ऋषिकुमारांनी शमीक यांच्या गळ्यातील साप काढून टाकला. तेवढ्यात शमीक ध्यानातून बाहेर आले. काय घडले आहे, असे विचारल्यावर श्रृंगीने सर्व हकीकत वडिलांना कथन केली.

भगवंताला शरण जाऊन झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना करावी

राजा परिक्षित यांनी मोठी चूक केलेली नाही. त्यांना सर्पदंशाचा शाप देणे योग्य नाही. असे वागणे आपल्याला शोभत नाही. अजून सर्व ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही. भगवंताला शरण जाऊन झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना करावी, अशी समज वडिलांनी श्रृंगीला दिली. दुसरीकडे, राजभवनात पोहोचल्यावर राजाला आपली चूक समजली. थोड्याच वेळात शमीक ऋषींचे शिष्य राजा परिक्षितांकडे पोहोचले. राजन, शमीक ऋषी ब्रह्मसमाधीमध्ये लीन असल्याने आपले आदारतिथ्य करता आले नाही. याबाबत त्यांना खेद वाटतो आहे. मात्र, कोणताही विचार न करता आपण त्यांच्या गळ्यात मृत साप टाकल्याने श्रृंगी क्रोधीत झाले आणि पुढील सात दिवसात सर्पदंशाने आपला मृत्यू होईल, असा शाप दिला आहे. श्रृंगींचा शाप असत्य ठरणार नाही, असे सांगितले.

...अन् भागवत सप्ताहाची सुरुवात झाली

आपल्या चुकीची योग्य प्रकारे शिक्षा मिळत आहे, याबद्दल राजा परिक्षित यांना समाधान वाटले. सात दिवस ईश्वर-चिंतन आणि मोक्षमार्ग साधनेत घालवावेत, असा सल्ला राजाला देण्यात आला. राजा परिक्षित व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडे गेले. शुकदेव यांनी राजा परिक्षित यांना सात दिवस सलग भागवत कथा ऐकवली. तेव्हापासून भागवत सप्ताहाची सुरुवात झाली, असे सांगितले जाते. 

॥ एकश्लोकी भागवतम् ॥

आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनम्मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतां पालनम्एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ।

इति श्रीभागवतसूत्र ॥

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025